नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आंदोलकांशी येत्या दि. २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकार व ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीचे निमंत्रण नागपुरात सुरू असलेल्या संविधान चौक येथील ओबीसी आंदोलनस्थळी लवकरच आमदार परिणय फुके घेऊन पोहोचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान राज्य सरकारकडून मराठ्यांना कुणबी सरसकट प्रमाणपत्र व त्यांचे ओबीसीकरण होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ओबीसी महासंघाचे नेते,अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता ओबीसी आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजेच त्यांचे ओबीसीकरण करणे आहे. आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही ,असा सज्जड इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी यापूर्वीच दिला आहे.
नागपुरातील संविधान चौकात गेल्या १३ दिवसांपासून ओबीसी समाजाचे, विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. यासह १२ दिवसापासून चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. याकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही.
मराठा समाजाच्या उपोषणाची, आंदोलनाची तातडीने दखल घेण्यात आली. मात्र, ओबीसी समाजाला दुर्लक्षित केले जात आहे. हे केवळ मराठ्यांचे सरकार आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी ओबीसी समाज प्रतिनिधी राज्यभरात उपोषणाला बसले आहेत. हे उपोषण मागे घेण्याच्या विनंतीसह राज्य शासनाने दि. २९ तारखेला चर्चा करण्यासाठी निमंत्रण पाठविले आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाच्या नावाची यादी काढली आहे. या यादीत ४५ लोकांची नावे आहेत. आज (दि.२२) नागपुरातील संविधान चौक येथील उपोषणस्थळी हे पत्र भाजपचे माजी मंत्री परिणय फुके घेऊन आले. दि. २९ तारखेला होणाऱ्या चर्चेत नक्की तोडगा निघेल, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांना हे पत्र देण्यात आले आहे. या पत्राबाबत ओबीसी महासंघ आजच संपुर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन आपला निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे अशी माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली.
हेही वाचा :