पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी नुकतेच सनातन धर्म नष्ट करण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. त्यांच्याशिवाय तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. तुम्ही असे वक्तव्य का केले आणि त्याची गरज काय होती, असा सवाल न्यायालयाने केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी यांच्या सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर मागितले. पण आधी हायकोर्टात जाण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे, असेही याचिकाकर्त्यांना सांगण्यात आले. खंडपीठाने 'तुम्ही इथे का आलात?' तुम्ही उच्च न्यायालयात जावे. याप्रकरणी एफआयआर नोंदवावा, अशी तुमची मागणी आहे. तुम्ही आम्हाला पोलीस ठाणे मानले आहे. यावर याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ वकिलाने सांगितले की, द्वेषयुक्त भाषणाची अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. ते म्हणाले, 'जेव्हा राज्यच एखाद्या धर्माला संपवण्याची भाषा करते आणि मुलांना त्याविरुद्ध बोलण्यासाठी प्रेरित करते, तेव्हा सर्वोच्च न्यायालय हे एकमेव ठिकाण आहे जिथे अशा प्रकराणाची दखल घेतली जाऊ शकते.'
याचिकाकर्ते वकिल म्हणाले, राज्य सरकारने एक परिपत्रकही जारी केले आहे, ज्यामध्ये मुलांना सनातन धर्माविरुद्ध बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनात्मक संस्थेकडून एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्यात येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.' या युक्तिवादाला सहमती दर्शवत न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि उदयनिधी स्टॅलिन, तामिळनाडू सरकार आणि द्रमुक यांना नोटीस बजावली.
उदयनिधी हे तमिळनाडू सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी 2 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर वादग्रस्त टीप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, 'सनातन धर्म हा डेंग्यू-मलेरियासाखा आहे. त्याच्यावर उपचार करुन उपयोग नाही त्याला नष्टच केलं पाहिजे. सनातन धर्म हा विषमतावादी धर्म आहे, समाजाला त्याचा उपयोग नाही.' या विधानानंतर मोठा गदारोळ झाला. अनेक ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलने झाली. उदयनिधी यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली.
स्टॅलिन यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. भारतीय जनता पक्षाकडून देखील त्यांच्यावर निशाणा साधला गेला होता. स्टॅलिन यांचे हे विधान म्हणजे त्यांनी सनातन धर्माला मानणाऱ्या हिंदूचा नरसंहार करण्याचं केलेलं आवाहन आहे. अशी टीका भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. मिरा रोड पोलीस ठाण्यात स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता.