‘महाविकास आघाडी सरकारकडून शेतक-यांची फसवणूक’

‘महाविकास आघाडी सरकारकडून शेतक-यांची फसवणूक’
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करु अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप ५० पैसे देखील जमा झाले नाहीत. हा जनआक्रोश त्या शेतक-यांसाठी आहे. पुढील महिनाभरात जर सरकारने ५० हजार रूपये नियमित कर्ज भरणा-या शेतकऱ्याच्या खात्यात टाकले नाही तर हा जनआक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

आज गुरूवारी २१ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपुरात गांधी चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित जनआक्रोश आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी १.०६ कोटी गरीब शेतकरी आहेत. ६ मार्च २०२० रोजी विधानसभेत ठाकरे सरकारने नियमित कर्ज भरणा-या शेतकरऱ्यांच्या खात्यात आम्ही ५० हजार रूपये जमा करू ही घोषणा केली. परंतु, अद्याप ती पूर्ण झाली नाही आणि शेतक-यांची फसवणूक करण्यात आली. पुन्हा ८ मार्च २०२१ रोजी तीच घोषणा केली. पुन्हा एकदा सरकार खोटे बोलले. ११ मार्च २०२२ रोजी पुन्हा घोषणा केली. अजुनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात ५० पैसे शुध्दा जमा झाले नाही.

आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आज चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते कडक उन्हात एकत्र येवून सरकारला प्रश्न विचारायला व उत्तर मागायला आले आहेत. जिल्ह्यात कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज निर्मीती केंद्र आहे. आम्ही प्रदूषण सहन करतो आणि हे सरकार आमच्याच जिल्ह्यात लोडशेडींग करते, हे अजिबात चालणार नाही. शेतक-यांना पाणी दिले नाही तर पीक नष्ट होतील. आजही भारनियमन सुरू आहे, हे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. माझा अधिका-यांविरूध्द रोष नाही. सरकारविरूध्द हा एल्गार आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजूरी देण्यात आलेली नाही. राज्यात सर्वात जास्त वीजेचे बिल भरणा-या पाच जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा आहे. आपण ९३ टक्के वीज बिल भरणा करतो. विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आलेली नाही. धडक सिंचन विहिरींचे पैसे देण्यात आलेले नाही. रेशनकार्डावर धान्य दिले जात नाही. पेट्रोल, डिझेलवरचा टॅक्स महाराष्ट्र शासनाने कमी केलेला नाही. २२ राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहे. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक यासंदर्भात दिरंगाई करत असल्याचा आरोप आ. मुनगंटीवार यांनी केला.

आ. सुधीर मुनगंटीवार धानाचा बोनस शेतक-यांना मिळालेला नाही, अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना त्वरीत धान्य उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतक-यांच्या कृषीपंपांना त्वरीत वीज कनेक्शन देण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतक-यांना तातडीने देणे आवश्यक आहे. तसेच मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजजना करण्याची गरज आहे. चंद्रपूर महानगरात नझूल निवासी घर धारकांना मालकी पट्टे देण्यात आलेले नाही. आदिवासी व गैरआदिवासी बांधवांना वनजमिनीवरील अतिक्रमणाचे स्थायी पट्टे देण्याची आवश्यकता आहे. यासर्व मागण्यांसाठी हा जनआक्रोश आहे. या जनआक्रोश आंदोलनाची तातडीने शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, सुदर्शन निमकर, वनिता कानडे, विजय राऊत, राजेंद्र गांधी, हरीश शर्मा, चंद्रपूर महानगर भाजपाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नामदेव डाहुले, आशिष देवतळे, अल्का आत्राम, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, संदीप आवारी, प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, अंजली घोटेकर, विशाल निंबाळकर, सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news