नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला 212 कोटी रुपयांची प्राप्ती झाली आहे. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सकडून (एडीआर) गुरुवारी (दि.21) देण्यात आली. कंपन्या आणि वैयक्तिक लोकांनी सात इलेक्ट्रोरल ट्रस्टना निधी दिला होता. यापैकी सर्वाधिक म्हणजे 82 टक्के भाजपला देण्यात आला आहे, असे एडीआरने आपल्या अहवालात म्हटले आहे.
राजकीय पक्षांना दिल्या जाणार्या निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रोरल बाँडची पध्दत अवलंबली जात आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 23 पैकी 16 इलेक्ट्रोरल ट्रस्टने आपल्या व्यवहारांचा तपशील दिला आहे. यामध्ये केवळ सात ट्रस्टनी राजकीय पक्षांना दिलेल्या पैशाबाबतची माहिती जाहीर केली आहे. सात इलेक्ट्रोरल ट्रस्टना सदर आर्थिक वर्षात 258.49 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातील 212.05 कोटी रुपये भाजपला देण्यात आला आहे. वाटप करण्यात आलेल्या देणग्यांपैकी ही रक्कम तब्बल 82 टक्के इतकी आहे.
भाजपनंतर संयुक्त जनता दलाला 27 कोटी रुपये अर्थात 10.45 टक्के इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक, राष्ट्रवादी, द्रमुक, राजद, आम आदमी पक्ष, लोकजनशक्ती पार्टी, भाकप, माकप तसेच लोकतांत्रिक जनता दल या पक्षांना एकत्रितपणे अवघी 19.38 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली. दरम्यान, नियमानुसार प्राप्त झालेल्या देणग्यांपैकी 95 टक्के रक्कम त्या-त्या वर्षी इलेक्ट्रोरल ट्रस्टना संबंधित देणगीदारांनी सांगितलेल्या राजकीय पक्षांना द्यावी लागते.
हेही वाचा