गडचिरोलीत मोठी दुर्घटना; वैनगंगा नदीत नाव उलटून ६ महिलांचा मृत्यू | पुढारी

गडचिरोलीत मोठी दुर्घटना; वैनगंगा नदीत नाव उलटून ६ महिलांचा मृत्यू

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : वैनगंगा नदीतून छोट्या नावेने प्रवास करीत असताना नाव उलटल्याने ६ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) गावानजीक घडली. एका महिलेचा मृतदेह सापडला असून, अन्य महिलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

जीजाबाई दादाजी राऊत, पुष्पा मुक्तेश्वर झाडे, रेवंता हरिश्चंद्र झाडे, मायाबाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत, बुधाबाई देवाजी राऊत सर्व रा.गणपूर (रै) अशी मृतांची नावे आहेत. सारुबाई सुरेश कस्तुरे या महिलेचे प्राण वाचले.

गणपूर (रै) गावापासून काही अंतरावर वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. नेहमीप्रमाणे आज गणपूर येथील काही महिला दोन छोट्या नावेने वैनगंगा नदीतून प्रवास करुन चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी जात होत्या. दोन्ही नाव एकापाठोपाठ होत्या. चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदीपात्रात पाण्याची पातळीही वाढली आहे. शिवाय ढगाळ हवामान व वारा सुटल्याने नाव हेलकावे घेत होत्या. काही क्षणातच दोन्ही नाव उलटल्याने सर्व महिला पाण्यात बुडाल्या. मागची नाव खडकाजवळ उलटल्याने तेथील महिला कशाबशा बाहेर पडल्या. मात्र, पुढे गेलेली नाव खोल पाण्यात उलटली. यात सहा महिला बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर एक महिला बचावली. माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहीपर्यंत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे गणपूर गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button