Dhule Crime News : हत्याराचा धाक दाखवून रस्ता लूट करणाऱ्या दोघांना बेड्या 

Dhule Crime News : हत्याराचा धाक दाखवून रस्ता लूट करणाऱ्या दोघांना बेड्या 

धुळे ; पुढारी वृत्तसेवा– मुंबई आग्रा महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकांची लूट करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. या टोळीतील दोघांना मालेगाव येथून अटक करण्यात आली असून या दोन्ही आरोपींच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज दिली आहे.

धुळे येथील रहिवासी असणारा अनस खान हा युवक त्याच्या मित्रांसोबत (एम एच 18 बीएस 0141) या दुचाकीने मालेगाव येथून व्यापाऱ्याचे पैसे घेऊन धुळे येथे परत येत होता. या दोघांजवळ दोन लाख 45 हजार 300 रुपयांची रोकड होती. धुळे शहरा नजीक असणाऱ्या लळींग घाटात मालेगाव कडून दोन मोटरसायकलवर पाच तरुण आले. त्यांनी हत्याराचा धाक दाखवून अनसखान याला थांबवले. यानंतर त्याच्याकडील बॅग हिसकून पलायन केले. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर पद्धतीने करीत होती. यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहिती दाराच्या माध्यमातून हा गुन्हा मालेगाव येथील आरोपींनी केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपींची तांत्रिक माहिती गोळा करणे सुरू केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकातील मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन, सुनील शेंडे, अमोल जाधव, हर्षल चौधरी, राजू गीते यांच्या मदतीने मालेगाव येथून चेतन गणेश परदेशी आणि मोमीन मुजाहिद हुसेन मुक्तार अहमद या दोघांच्या मुस्क्या आवळल्या. यातील चेतन गणेश परदेशी याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असा ऐवज आढळून आला. तर मोमीन मुजाहिद मुक्तार अहमद यांच्या ताब्यातून रोकड आणि मोबाईल असा ऐवज आढळला. या दोघांची सखोल चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये हर्षल उर्फ लहान्या देविदास जाधव, विवेक भिकन परदेशी, अजय पाटील, हर्षद कांडी असे अन्य आरोपी असल्याची माहिती देखील पुढे आली. या टोळक्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news