विजय वडेट्टीवार ओबीसींच्याही पाठीत खंजीर खुपसतील: आशिष देशमुख | पुढारी

विजय वडेट्टीवार ओबीसींच्याही पाठीत खंजीर खुपसतील: आशिष देशमुख

 गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आजपर्यंत कोणत्याही पक्ष वा नेत्याशी प्रामाणिक राहिले नाहीत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता हेच वडेट्टीवार एक दिवस ओबीसी समाजाच्याही पाठीत खंजीर खुपसतील, अशी घणाघाती टीका, भाजप नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली.

माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वातील ओबीसी जागर यात्रा आज गडचिरोलीत आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात देशमुख बोलत होते. याप्रसंगी खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अनिल पोहनकर, मुक्तेश्वर काटवे, रवींद्र गोटेफोडे, अनिल तिडके, रेखा डोळस, योगिता पिपरे, डॉ.संगीता राऊत,गीता हिंगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

देशमुख पुढे म्हणाले, विजय वडेट्टीवार हे सुरुवातीला शिवसेनेत होते. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते नारायण राणे यांच्यासोबत गेले. त्यानंतर राणे यांना सोडून अशोक चव्हाण यांच्यासोबत राहिले आणि आता चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद हिसकावून घेतलं.

गडचिरोली‍ जिल्ह्यात होणाऱ्या सरकारी नोकरभरतीत ओबीसी उमेदवारांवर अन्याय झाला, तेव्हा वडेट्टीवार काय करीत होते, असा सवाल करुन देशमुख यांनी वडेट्टीवार हे ओबीसींच्याही पाठीत खंजीर खुपसतील, अशी टीका केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीची निर्मिती करुन ४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. स्वतंत्र वसतिगृहांचीही निर्मिती केली. पंतप्रधानांनी ओबीसींना १० लाख घरे देण्याची योजना सुरु केली. आता ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी भाजपची ओबीसी आघाडी प्रयत्नशिल असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबत आश्वस्त केल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मनोज जरांगे हे खोटे बोलताहेत: आशिष देशमुख

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना कुणबी समाजाचे दाखले देण्यात येतील, असे कुठलेही आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. परंतु, मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे हे जनतेला खोटी माहिती देताहेत, असा आरोप भाजपचे नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला.

फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकले. परंतु नंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितरित्या बाजू न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही, असा आरोप देशमुख यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button