खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला खाली खेचा: संजना धाडी | पुढारी

खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला खाली खेचा: संजना धाडी

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा: बेरोजगारांना नोकऱ्या देतो, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र शासनाला खाली खेचण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य जनतेने आता जागृत व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना धाडी यांनी नृसिंहवाडी येथे केले. त्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील होते.

यावेळी शिरोळ विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव मालुसरे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.
धाडी पुढे बोलताना म्हणाल्या की, महागाईचा भस्मासुर, बेकारीचे वाढते प्रमाण, महिलावरील अत्याचार आणि जातीय दंगलीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार घालवण्याची वेळ आता आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला असून देशाला अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतीच्या दावणीला बांधले आहे. काश्मीरमध्ये 370 कलम हटवले. मात्र, दररोज हजारो हिंदूच्या हत्या होत आहेत. त्याला आळा घालण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे.

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी स्वागत केले. तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी आभार मानले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे, बाबासाहेब सावगावे, दत्तात्रय कामत, वैशाली जुगळे, संजय अनुसे, गणेश सुतार, साजिदा घोरी, सुरेश पवार आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button