चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरतीसाठी २१६७८ पद भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. याबाबत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. आज (दि.२) त्यांच्या मागणीला यश आले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील अनेक शाळांमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान यासह अनेक विषयाची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक भरती तात्काळ व्हावी, म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत अनेकदा आवाज उठविला. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन शिक्षक भरती तात्काळ करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून राज्यातील ३४ जिल्हा परिषद शाळेत १२५२२, १८ मनपातील शाळेत २९५१, ८० नगर परिषद/नगर पालिकेतील शाळेत ४७७ तसेच राज्यातील ११२३ खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शाळेत ५७२८ रिक्त पदांची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ मधील उर्तीण उमेदवारांना प्राधान्य क्रम दाखल करण्यासाठी संदेश प्राप्त झाले आहेत. या प्राधान्य क्रमाच्या आधारे लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया पुर्ण होणार आहे. या भरती प्रक्रियेत सध्या ७० टक्के रिक्त जागांवर भरती होणार असून उर्वरीत ३० टक्के रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, याकरीता पाठ पुरावा करणार असल्याचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.
हेही वाचा :