

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये पैशासाठी स्वतःच्याच मुलांना विकणाऱ्या एका आईचे कृत्य उघडकीस आले आहे. आपल्या दोन निष्पाप मुलांना केवळ दोन लाख रुपयांना विकल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्या १५ वर्षांच्या मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा कट रचला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला आणि संपूर्ण रॅकेट समोर आले.
या प्रकरणात, रामनगर पोलिसांनी आरोपी आई आणि बाळ विकत घेणाऱ्या दोन महिलांना गुरुवारी अटक केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चारही आरोपींवर मानवी तस्करी विरोधी (अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग) आणि पॉक्सो (लैंगिक गुन्हे प्रतिबंधक) कायद्यांतर्गत बुधवारी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर, तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच, नराधम अजयचे लक्ष त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीकडे गेले. त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. जेव्हा ती मुलगी गरोदर राहिली, तेव्हा चंद्रपूरमध्ये बदनामीच्या भीतीने अजय आणि त्याच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाचा संशय टाळण्यासाठी, त्यांनी ‘आमची सर्व कागदपत्रे पुरात वाहून गेली’ अशी खोटी कहाणी रचली आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना मुलीच्या वयाबद्दल शंका आली. कोणताही वेळ न घालवता, त्यांनी हे प्रकरण नागपूरच्या अजनी पोलिसांकडे सोपवले. अजनी पोलिसांनी तात्काळ झिरो एफआयआर नोंदवून पोलिसांना संपर्क केला. रामनगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) अश्विनी वाकडे यांनी तपासाचा ताबा घेताच, पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला.
दोन लाख रूपयांना विकले बाळाला
जबाब देताना, तिला संशय आला की हे केवळ लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नसून, यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. जेव्हा पोलिसांनी पीडितेच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने कबूल केले की तिने यापूर्वी तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर आपल्या दोन मुलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकले होते. ती आपल्या अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्मलेल्या नवजात बाळालाही त्याच प्रकारे विकण्याची योजना आखत होती. या धक्कादायक खुलास्यानंतर, पोलिसांनी मानवी तस्करीचे आरोप लावून कारवाई अधिक तीव्र केली. पोलिसांनी एका बाल खरेदीदाराला थेट तेलंगणातील कागजनगर येथून आणि दुसऱ्या एका महिलेला चंद्रपूर येथून अटक केली.
फरार आरोपीचा शोध सुरू
फरार मुख्य आरोपी अजय फुलझेले याला अटक करण्यासाठी पोलीस पथके सातत्याने छापे टाकत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोन महीलांना न्यायालयीन कोठडी तर बाळ विकणाऱ्या महीलेला १ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही मोठी कारवाई रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि एसडीपीओ प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
या घटनेतील ३आरोपी अटकेत असून सखोल तपास सुरू आहे.एक महिला स्वतःच्या बाळाला विकते अशी माहिती नागरिकांनी दिली होती. तपासात ही बाब निष्पन्न झाली. आईच बाळाची तस्करी करते,हे ऐकून मन सुन्न झाले. हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे. या घटनेतील आरोपी अजय फुलझेले याचा शोध पोलीस घेत आहे. तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल. आणखी यात खुलासे होण्याची शक्यता आहे.
प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, रामनगर, चंद्रपूर.