

भंडारा : जल, जंगल, जमीन अशा समृद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याची ओळख तशी मागासलेली. परंतु, याच संसाधनांचा उपयोग करुन जिल्ह्याला समृद्ध करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातून घडले. सिंचन मंत्री असताना गोसेखुर्द प्रकल्प, बावनथडी प्रकल्प, करचखेडा उपसा सिंचन योजनांमधून जिल्ह्यातील सिंचनक्षेत्राला खऱ्या अर्थाने त्यांच्याच कारकिर्दीत गती मिळाली. नागपूर ते मुंबईपर्यंत असलेल्या समृद्धी महामार्गाची व्याप्ती भंडारा-गोंदियापर्यंत करण्यातही अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे.
पूर्व विदर्भात हरीतक्रांती घडवून आणणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाची वाट तशी खडतर राहिली. कासवगतीने प्रकल्पाचे काम सुरू होते. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पात राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले. अनेकदा त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट घेऊन आढावाही घेतला. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांचे कानही टोचले.
आज गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वास आले असून लाखो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पावर आधारित अनेक उपसा सिंचन योजनाही कार्यान्वित झाले आहेत, त्याचे खरे श्रेय प्रफुल पटेल यांच्यासह अजित पवार यांनाही जाते. प्रत्येकवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोसेखुर्द प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी अर्थमंत्री अजित पवार निधीची तरतूद करीत असत.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील तुमसर तालुक्यातील सितेकसा गावाजवळील बावनथडी नदीवरील बावनथडी सिंचन प्रकल्पाला 1975 मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पाच्याही पूर्णत्वासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. निधीच्या उपलब्धतेमुळे आज हा प्रकल्प पूर्ण झाला असून तुमसर, मोहाडी व भंडारा तालुक्यातील 77 गावांना सिंचन होत आहे. वैनगंगा नदीवरील करचखेडा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यासाठी अजित पवार स्वत: करचखेडा येथे आले होते.
20 नोव्हेंबर 2023 रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार भंडारा येथे आले होते. ‘भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या अधिक असून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. याशिवाय निसर्ग संपदा आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी तीच ती पिके घेण्याऐवजी नगदी पिके घेण्याची गरज आहे’, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले होते.
28 सप्टेंबर 2024 रोजी जनसन्मान यात्रेनिमीत्त अजित पवार हे तुमसर येथे आले होते. भंडारा जिल्ह्यातील त्यांची ही भेट अखेरची ठरली. बुधवारी सकाळी विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सिंचनाला गती देणारा लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सन 2006 ची गोष्ट. गोसेखुर्द प्रकल्पाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू होते. तत्कालिन सिंचन मंत्री अजित पवार यांची गोसेखुर्दला भेट ठरली. ठरलेल्या वेळेनुसार अजित पवार सकाळी 7 वाजता गोसेखुर्दला पोहोचले, परंतु अधिकारी मात्र 15 मिनिटे उशिरा आले. तेव्हा अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ‘प्रकल्पाची कामे लवकर करा’ असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या असल्याने प्रकल्पग्रस्तांनी धरणावर डफळी वाजवत आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अजित पवार समोर सरसावले. पोलिसांना म्हणाले, ‘तेही माणसंच आहेत. त्यांचे ऐकून घेतले पाहिजे’, असे म्हणत अजित पवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण मागण्या ऐकून घेतल्या. अजित पवार यांचा हा अनुभव आजही अनेकांच्या लक्षात आहे.