

Warthi Sunflag Company Worker Death
भंडारा: वरठी येथील सॅनफ्लॅग कंपनीत कार्यरत एका कामगाराचा कर्तव्यावर असताना अपघात होऊन मृत्यू झाला. परंतु, कंपनी प्रशासनाने त्यांच्या मृत्यूचा खोटा अहवाल दिल्याने कामगार संतप्त झाले. कामगारांसह गावकऱ्यांनी मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू केले. दोन तासांपासून हे आंदोलन सुरूच असून कंपनी प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.
मारोती भिवगडे (वय ४५, रा. पाचगाव, ता. मोहाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. मारोती यांची कारखान्यात सकाळपाळीत ड्युटी होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास क्रेनवर काम करीत असताना अचानक क्रेनवरुन पडून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर दुसरीकडे, कंपनी प्रशासनाने मारोती यांचा मृत्यू उपचार सुरू असताना झाल्याचा खोटा अहवाल दिल्याने कामगार संतप्त झाले. पाचगावात ही माहिती पोहोचताच गावकरीही कारखान्यात पोहोचले. कंपनीच्या मुख्यद्वारावर नागरिकांचा चक्काजाम आंदोलन सुरू झाला. शेकडोच्या संख्येने नातेवाईक व नागरिकांनी घेराव घातला.
मृत कामगार मारोती भिवगडे यांचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन सुरू झाले. परंतु, कंपनी प्रशासनाने ताठर भूमिका घेत त्यांच्या मागण्यांची काहीच दखल न घेतल्याने आंदोलन सुरूच होते. मृत कामगार मारोती भिवगडे यांना एक मुलगा व मुलगी आहे. घरातील ते एकुलते कमावते होते.