

State Tax Inspector Bribe Case
भंडारा : बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील राज्य कर निरीक्षकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवार, २० जानेवारी रोजी भंडारा येथील वस्तू व कर विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
मनीष मुरलीधर सहारे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर २०२५ पासून बंद होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी जीएसटी विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यानंतर नागपूर येथील जीएसटी कार्यालयाकडून फर्मचे लेजर शीट तयार करून त्यानुसार चलन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तक्रारदारांनी लेजर शीट तयार करून १० हजार ४२८ रुपये ऑनलाइन चलन भरले.
यानंतर तक्रारदारांनी भंडारा येथील वस्तू व सेवा कर विभागात राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांची भेट घेऊन जीएसटी क्रमांक अद्याप सुरू न झाल्याची माहिती दिली. यावेळी सहारे यांनी बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी १५ जानेवारी रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ जानेवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, संबंधित अधिकाऱ्याने ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
आज २० जानेवारी रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी राज्य कर निरीक्षक मनीष मुरलीधर सहारे यांनी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताच त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून, घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक उज्वला मडावी, पोलिस निरीक्षक नितेश देशमुख, हवालदार अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, सुमेध रामटेके, हिरा लांडगे, हितेश हलमारे, राजकुमार लेंडे, प्रतीक उके, मयूर सिंगणजुडे, दुर्गा साखरे, पंकज सरोते यांनी केली.