भाजपच्या जम्बो कार्यकारिणीत खासदार गटाला डच्चू; पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र

भाजपच्या जम्बो कार्यकारिणीत खासदार गटाला डच्चू; पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी पक्षाची विस्तारीत कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत खासदार सुनील मेंढे यांच्या गटाला डच्चू देऊन माजी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या गटाला झुकते माप दिल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष असल्याने काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

प्रकाश बाळबुद्धे यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे आल्यानंतर नव्या कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अपेक्षेनुसार त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात १६ उपाध्यक्ष, १३ सचिव, ४ महामंत्री आदींचा समावेश आहे. ही कार्यकारिणी जाहीर होताच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये 'कही खुशी, कमी गम' असे चित्र आहे.

वरवर पाहता भाजपात सर्व व्यवस्थित असले तरी अंतर्गत मतभेद असल्याचे खुद्द कार्यकर्ते सांगतात. खासदार सुनील मेंढे आणि माजी आमदार परिणय फुके या दोन नेत्यांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वाटणी झाली आहे. दोन नेत्यांसह कार्यकर्त्यांचेही दोन गट पडले आहेत. नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत ही बाब स्पष्टपणे दिसते. कार्यकारिणीत खासदार सुनील मेंढे यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येऊन माजी आमदार परिणय फुके यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी देण्यात आली आहे.
तथापि, पदे देताना अन्याय झाल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. खासदार सुनील मेंढे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे पवनी तालुकाध्यक्ष मोहन सुरकर यांनी कार्यकारिणी जाहीर झाल्याबरोबर पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपविला.

भाजपातील अंतर्गत कलहामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. नव्या कार्यकारिणीमुळे भाजपातील दोन गटांमधील कलह समोर आला आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news