राष्ट्रवादीचे युवा नेते नागपुरात, दिक्षाभूमीला भेट, कार्यकर्त्यांशी संवाद | पुढारी

राष्ट्रवादीचे युवा नेते नागपुरात, दिक्षाभूमीला भेट, कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि अजित पवार गटाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यानंतर आता शरद पवार गटाने आपली शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते मैदानात उतरले असून बुधवारी नागपूरमध्ये विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या दिवसभर चालणाऱ्या बैठकीसाठी आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील नागपुरात आले आहेत. जि.प.सदस्य सलिल देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासोबत त्यांनी आज दिक्षाभूमीला भेट दिली. टेकडी गणेशाचे दर्शन घेतले. सायंकाळी ते ताजबागला जाणार आहेत.

या विदर्भस्तरीय बैठकीतून पक्ष विस्तारासंदर्भात मंथन होणार आहे. पुढील महिन्यात ३-४ ऑक्टोबरला पुन्हा आम्ही जिल्हानिहाय दौरा करणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिक्षाभूमी येथे दिली. दिवसभर सिव्हिल लाइन्स येथील स्वागत लॉन येथे आयोजित विदर्भस्तरीय बैठकीला उपस्थित राहून ‘घेऊन आलो साहेबांचा संदेश’ या माता जिजाऊंच्या सिंदखेडराजा येथून सुरू झालेल्या अभियानांतर्गत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संदेश पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. दरम्यान, इंडिया आघाडीत सहभागी समविचारी घटकपक्षांचीही रवी भवन येथे बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, राजू राऊत, प्रदेश प्रवक्ते वेदप्रकाश आर्य, प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले, शेखर सावरबांधे, नुतन रेवतकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रोहित पवार यांचा नागपुरी तर्री पोह्यांवर ताव

दरम्यान, आज नागपूर मुक्कामी असलेल्या आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांनी नागपूरात दाखल झाल्यानंतर वर्धा रोड स्थित प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत तर्री पोह्याचा आस्वाद घेतला.

हेही वाचा : 

Back to top button