पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या X खात्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, "माईकवरील संवाद 'सोशल मीडिया'वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे." (Maharashtra Politics)
'आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं'
जालना येथे जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी २९ ऑगस्टपासून बेमूदत उपाेषण सुरु केले आहे. मंगळवारी त्यांच्या उपाेषणाचा पंधरावा दिवस होता. जरांगे पाटील यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवत एका महिनाच्या कालावधी दिला. हे प्रकरण चर्चेत असतानाच सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंबंधी बैठक मंगळवारी (दि.१२) घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला हे तिघे बोलत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की,
एकनाथ शिंदे : "आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं."
अजित पवार : "हो,येस…"
देवेंद्र फडणवीस : "माईक चालू आहे"
व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या X खात्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, "मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद 'सोशल मीडिया'वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे."
मंगळवारी (दि.१२) संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलेेले. चर्चेदरम्यान भिडे म्हणाले होते की, "आता राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे. आता जे राजकारणात सत्तेवर बसले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे ते कपटी नाहीत, तर देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले तरी काळजी करणारा माणूस आहे. सरकारमधील हे तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे असेल. हे उपोषण मागे घ्यावे. जो पर्यंत मराठा आंदोलनाचा जो उद्देश आहे. तो सफल होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत." भिडे यांचे वक्तव्य चर्चेत असतानाच शिंदे, फडणवीस आणि पवार यांचा व्हिडिओ व्हायरल होवू लागला आहे. त्यांना सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीका होऊ लागली आहे.