

भंडारा; पुढारी वृत्तसेवा
धावत्या रेल्वे गाडीतून मुलगा पडल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा तोल गेल्याने ती सुद्धा खाली पडली. या घटनेत मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर आईचा रेल्वे खांबाला आदळल्याने मृत्यू झाला.
ही दुर्देवी घटना भंडारा ते गोंदिया रेल्वेमार्गावरील माडगी येथील वैनगंगा नदीच्या रेल्वे पुलावर घडली. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
पूजा इशांत रामटेके (३०) व अथर्व इशांत रामटेके (दीड वर्ष) रा. टेकानाका नागपूर असे मृत आई व मुलाचे नाव आहे.
इशांत रामटेके हे पत्नी पूजा आणि मुलगा अथर्वसोबत रविवारी रात्री नागपूरवरुन गोंदियाच्या दिशेने रेल्वेने जात होते. तुमसर रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढील प्रवासाला निघाल्यानंतर पत्नी पूजा लघुशंका करण्यासाठी गाडीतील प्रसाधनगृहाकडे निघाली.
गाडी वैनगंगा नदीच्या पुलावर येताच तिचा दीड वर्षाचा मुलगा धावत पुढे गेला. त्याचवेळी तो वैनगंगा नदीत पडला. मुलाला वाचविण्यासाठी पूजाचा तोल गेला आणि तीसुद्धा पुलावर कोसळली. या घटनेत मुलगा अथर्वचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. तर पूजाचा रेल्वे खांबाला आदळल्याने मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी रेल्वे कर्मचारी गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. याप्रकरणी करडी पोलिस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
हे ही वाचलं का ?