पुणे : कुत्र्याने दारात घाण केल्याचे निमित्त ! तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये फुल राडा, अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ | पुढारी

पुणे : कुत्र्याने दारात घाण केल्याचे निमित्त ! तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये फुल राडा, अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ

पुणे, पुढारी वृत्तसेवा : श्वानाने घाण केल्याच्या कारणातून दोन शेजार्‍यामध्ये वाद झाला. त्यातून तरुणी आणि तिच्या आईने लहान मुलाच्या अंगावर धावून जात मुलाच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या वाहनांची देखील तोडफोड केली. त्यानंतर आई आणि भावासोबत ही २१ वर्षाची तरुणी कर्वेनगर पोलीस चौकीत गेली. तेथे तिची तक्रार नोंदवून घेऊनही तिने महिला पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

एवढेच नाही तर चौकीचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना “ए तू हो बाजूला”, असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढुन बाजूला केले. थेट पोलीस चौकीतच पोलिसांसमोर हा हाय होल्टेज ड्रामा झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार पोलीस चौकीत एकाने मोबाईलमध्ये कैद केला असून, संबधीत तरुणी अर्वाच्च भाषेत पोलिसांशी बोलत असल्याचे दिसून येते. ही घटना कर्वेनगरमधील गुरुप्रसाद कॉलनीत रविवारी दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडली आहे.

याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय ४५, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहे. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. त्याचा राग मनात धरुन मृणाल पाटील ही फिर्यादी यांच्या मुलाचे अंगावर धावून गेली. फिर्यादींना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. संजना पाटील यांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकीवर वार करुन तोडफोड करुन नुकसान केले. तर पोलिस चौकीत राडा घातल्याप्रकरणी दुसरी फिर्याद महिला पोलीस कर्मचारी सुषमा घोळवे यांनी दिली आहे. त्यावरुन मृणाल किरण पाटील हिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मृणाल पाटील ही तिची आई संजना आणि भाऊ यांच्यासोबत कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्या होता. तेथे तक्रार न देता वारजे पोलीस चौकीत गेल्या. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेवूनही त्या पुन्हा कर्वेनगर पोलीस चौकीत आल्या. पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत, असे म्हणत असताना फिर्यादी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा मृणाल हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच कर्वेनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना “ए तू हो बाजूला” असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढून बाजूला केले. व फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

Back to top button