KL Rahul Record : टीम इंडियाचा ‘कॅप्टन’ होताच केएल राहुलची अनोख्या ‘रेकॉर्ड’ला गवसणी! | पुढारी

KL Rahul Record : टीम इंडियाचा ‘कॅप्टन’ होताच केएल राहुलची अनोख्या ‘रेकॉर्ड’ला गवसणी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला (KL Rahul Record) भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघाची धुरा सांभाळताच राहुलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. यात त्याने विराट कोहली मागे टाकले असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली.

सर्वात कमी प्रथम श्रेणी सामन्यांचे कर्णधारपद भूषवल्यानंतर केएल राहुल (KL Rahul Record) कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार होण्यापूर्वी राहुलला केवळ एका प्रथम श्रेणी सामन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव होता.

महेंद्रसिंह धोनीने कसोटी संघाचे कर्णधार पद स्वीकारण्यापूर्वी केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यात त्या संघाचे नेतृत्व केले होते. या यादीत पहिले स्थान अजिंक्य रहाणेचे आहे, जो प्रथम श्रेणीत कर्णधार म्हणून एकही सामना न खेळता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे. (KL Rahul Record)

दरम्यान, केएल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याची एकाग्रता भंगली आणि मार्को जेन्सनचा चेंडू स्टेडियमच्या बाहेर फटकावण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला. ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो बाद झाला. रबाडाने राहुलचा झेल टिपला. त्याने १३३ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश होता.

पाठीच्या दुखापतीमुळे कोहली जोहान्सबर्ग कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. जोहान्सबर्ग येथील कसोटी विराट खेळला असता तर केपटाऊनमधील तिसरा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील १००वा सामना ठरला असता. पण आता २५ फेब्रुवारीला बंगळूर येथे खेळवला जाणारा भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना विराटचा १०० कसोटी सामना ठरण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात विराटच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये हनुमा विहारीला संधी मिळाली आहे. विहारीने जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शेवटची कसोटी खेळली होती. (KL Rahul Record)

Back to top button