विदर्भाला गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू, पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

विदर्भाला गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू, पिकांचे मोठे नुकसान

अकोला : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होवून तूर, गहू व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीची बोंडे गळून पडल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, बाळापूरमध्ये अंगावर वीज पडल्याने एकाचा तर खामगावरोडवर दुचाकी अपघातात 1 जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मंगळवारी गारपिटीसह पाऊस झाला. या वेळी झालेल्या गारपिटीने अकोला, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरावर झाडे पडल्याने घरांचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यायामुळे विजेचे खांब कोसळले. अकोला शहरातील कौलखेड भागात कारवर झाड पडल्याने कार चक्काचूर झाल्याचीही घटना घडली.

या गारपिटीने प्राणी, पक्षी मृत्युमुखी पडले असून, बर्‍याच ठिकाणी नागरिकांना किरकोळ इजा झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते खामगाव रोडवर विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले. अकोला, मुर्तिजापूर तालुक्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली. पावसामुळे वीटभट्टी मालकांचे तसेच शेतातील गहू, हरभरा, आंबा पिकाचे नुकसान झाले. कपाशीचा शेवटचा बहर चांगला आला होता. मात्र आजच्या पावसाने तोही हिरावला गेला.

नुकसानाचा सर्व्हे करून भरपाई द्या : आमदार सावरकर

अतिवृष्टी, गारपीटमुळे भाजीपाला, तूर, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनी, महसूल विभाग कृषी विभागाने संयुक्तरीत्या सर्व्हे करून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत पुरवण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. सध्या शेतकरी अडचणीत असून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यादृष्टीने शासनाने त्वरित सर्वे करू शेतकऱ्यांना मदत द्यावी. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी मागणीही आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

गारपीट, वीज पडून १ ठार, अमरावती जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस

अमरावती : : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार आलेल्या पावसासह जिल्ह्याच्या काही भागात गारपीट देखील झाली. जोरदार वादळ आल्याने चांदूर रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील एका युवकाचा वीज पडल्याने मृत्यू झाला. मोर्शी, वरूड, चांदूर बाजार परिसरात झालेल्या गारपीटीने संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसासह गारपीटने संत्रा, तूर, हरभरा, भाजीपाला, कांदा, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

42 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

तळेगाव दशासर : स्थानिक वार्ड क्रमांक 1 निवासी तरुण शेतकरी शेतातून दुचाकीने घरी येत होता. निमगव्हाण मार्गाने येत असताना अचानक वादळासह पाऊस सुरू झाला. त्याचवेळी अचानक वीज पडल्याने वार्ड क्रमांक 1 मधील निवासी गजानन बापूराव मेंढे (42) शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निमगव्हाण मार्गावरील गुटखी नाल्याजवळ ही घटना मंगळवारी (28 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व परिवार आहे.

घाटलाडकी परिसरात गारपीट

चांदूर बाजार : तालुक्यातील घाटलाडकी, सांबोरा, वारोळी, नागरवाडी, बेसखेळा, वनी परिसरातील काही भागात मंगळवारी (28 डिसेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास छोट्या प्रमाणात गारपिटीसह पाऊस झाला. सद्यस्थितीत शेतात काही प्रमाणात तूर काढणीवर आली आहे. हरभरा फुलोरा अवस्थेत आहे. या गारपिटीमुळे फुलोरा घडून भविष्यात हरभऱ्याच्या उत्पादनात घट येऊ शकते. कांदा लागवडीसाठी रोपे तयार झालेले आहेत. या झालेल्या गारपिटीमुळे रोपाचे नुकसान होऊन कांदा उत्पादनात घट येऊ शकते. अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

कुर्हा येथे पाऊस

कुर्हा : परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. धुवारी असल्याने दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा शेतकर्यांवर संकट ओढावले आहे. पावसामुळे भविष्यात संत्रा मृगबहार फुटेल किंवा नाही या चिंतेत पुन्हा शेतकरी सापडला आहे. काढणीला आलेली तुर सुद्धा पाण्यात सापडली आहेत. कांद्याचे रोप सकाळच्या धुवारीमुळे धोक्यात आली आहे. चना व गहू पिकाला सुद्धा या पावसाचा फटका बसला आहे.

दर्यापूरात अवकाळी पाऊस

दर्यापूर : दर्यापूरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या सकाळी साडे तीन वाजता हलक्या पावसाच्या सरी आल्या. अवकाळी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गारपीटीचा संत्र्यास फटका

मोर्शी : वातावरण बदल व अवकाळी वादळी पावसाने तालुक्यातील विक्रमी संत्र्याचे उत्पादन कमी होण्याच्या मार्गावर आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी संत्र्यांवरील रोगराईमुळे मोर्शी, वरुड तालुक्यातील संत्रा शेतकरी संकटात सापडत हवालदिल झाला आहे. मंगळवारी (28 डिसेंबर) विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी वादळी पावसाने तालुक्यात शेतकर्यांचा संत्रा, तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच ढगाळ हवामानामुळे या नकदी पिकावर रोगराई पसरली आहे.

आंबिया बहाराची फुटीची शक्यता कमी

मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक अचानक वातावरण झालेला बदला सोबतच अवकाळी पावसाने आंबिया बहाराच्या संत्राला भाव मिळणे कठीण झाले आहे. झाडावर अडकलेला संत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा उत्पादकांना व संत्र्याच्या आंबिया बहाराला फटका बसला आहे. सतत ढगाळ वातावरण व अवकाळी वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबिया बहाराची फूट होण्याची शक्यता कमी आली आहे.

शिरजगाव कसबा येथे पावसाचा कहर

शिरजगांव कसबा : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा सह परिसरात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीटीने परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे संकेत आहे. हरभरा, तूर, कापूस पिकांचा यामध्ये समावेश आहे.

अवकाळी पाऊस बरसला

पथ्रोट : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळपासून ढगाळ वातावरण तसेच दिवसभर हवेत गारवा होता. सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. काही रब्बी पिकांना फायदेशीर असलेला पाऊस खरीप हंगामातील तूर व कापूस पिकासह संत्रा फळपिक तसेच कादा रोपवाटिकेस नुकसानकारकच ठरणार आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट झाल्याने पडल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शिवणी रसुलापूर येथे गारपीट

शिवणी रसुलापूर येथेही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा सर्वत्र खच पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकटानंतर अस्मानी संकट देखील आले आहे.

अंजनगाव सुर्जीत अवकाळी पाऊस

अंजनगाव सुर्जी : तालुक्यात सायंकाळी 5 वाजता जोरदार अवकाळी पाऊस पडला. तालुक्यात गारपीटीची घटना नसला तरी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.

मेळघाटात पिके धोक्यात

धारणी : ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाने यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा तर खरीपातील तूर, कापूस अशी पिके धोक्यात आली आहे. रब्बी पिकांची पेरणी झाल्यापासून दोन तीन दिवसाच्या आडमध्ये सतत रब्बी पिकांना पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तुरळक पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा वातावरणात बिघाड निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : घरच्या घरी बनवा स्वादिष्ट गोळी पुलाव | Receipe of Mutton Goli Pulaav

Back to top button