माद्रिद : अनेक लोक थक्क करणारे विश्वविक्रम करीत असतात. आता व्हिएतनाममधील दोन भावांनीही असाच भन्नाट विक्रम केला आहे. त्यापैकी एका भावाच्या डोक्यावर दुसरा भाऊ खाली डोके वर पाय करून व स्वतःचे संतुलन साधून उभा राहिला. अशा स्थितीत एका भावाने दुसर्याला डोक्यावर घेऊन 53 सेकंदांमध्ये तब्बल शंभर पायर्या चढून दाखवल्या!
23 डिसेंबरला स्पेनमधील सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या पायर्यांवर हा विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरलही होत आहे. जियांग क्वोक को (वय 37) आणि जियांग क्वोक नीप (32) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही सर्कशीत काम करतात. विशेष म्हणजे, अशाप्रकारचा विक्रम करण्याची दोघांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्येही त्यांनी 52 सेकंदांमध्ये 90 पायर्या अशा स्थितीत चढून दाखवल्या होत्या.
पुढे 2018 मध्ये या दोघांनी अशाच प्रकारे संतुलन साधत आणि डोळ्यांवर पट्टी बांधून दहा पायर्या चढून आणि उतरून दाखवल्या होत्या. पेरू देशातील पाब्लो नोनाटो आणि जॉईल याईकेट या दोन कलाकारांनीही जियांग बंधूंप्रमाणेच 52 सेकंदांमध्ये 91 पायर्या चढून नवा विक्रम केला होता. आता पुन्हा एकदा जियांग बंधूंनी पेरूच्या कलाकारांचा विक्रम मोडून स्वतःचा नवा विक्रम स्थापित केला आहे.