चंद्रकांत पाटील : हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीस सामोरे जा | पुढारी

चंद्रकांत पाटील : हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीस सामोरे जा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीची सगळी कारणं पूर्ण केली आहेत. हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीस सामोरे जा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

आ. पाटील म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांत एक-दोन नव्हे तर तब्बल तीन परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सगळ्याची पाळंमुळं राजकीय व्यक्तींपर्यंत जात आहेत. त्यामुळेच आम्ही सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार आहे. राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तरी हे सरकार ते नाकारत आहे म्हणजे हे सरकार राज्यपालांचाही अपमान करतंय. जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या महाराष्ट्र दौर्‍याचा संदर्भत देउन ते म्हणाले, सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला. त्यामुळे यापुढे सहकार वाढण्यास मदत होईल. कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी. काही गेले असतील तर त्याची कारणं वेगळी असतील. असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते असेच चित्र पाहायला मिळत आहे. इतर सर्वांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे सेनेतील घुसमट बाहेर पडेल. प्रचाराच्या पहिल्या सभेपासून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं होतं. ही माहिती आधीपासूनच होती तर त्यावेळी का विरोध केला नाही? असा प्रश्न यावेळी पाटील यांनी उपस्थित केला.

Back to top button