विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांना फटका:ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती | पुढारी

विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांना फटका:ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात २१ डिसेंबरला ३८ नगरपंचायती तसेच गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षणाचा राज्य शासनाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय. याचा फटका विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांना बसला. त्यात सर्वाधिक चंद्रपूरमध्ये २०, तर यवतमाळ जिल्ह्यातील १८ जागांचा समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ६८ जागांची निवडणूक स्थगित झाली आहे.

विदर्भातील ३८ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं घोषीत केला. त्यानुसार, सात डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारची शेवटची तारीख होती. पण, सहा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालायानं अध्यादेशाला स्थगिती दिल्यानं ओबीसी उमेदवार नाराज झाले.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटाप्लली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कुही, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, सेलू, कारंजा (घाडगे), आष्टी, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, बाभूळगाव, महागाव, मोरगाव, झरी जामणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, मोताळा तसेच वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. तेथील ओबीसी जागांवरील निवडणूक आता स्थगीत करण्यात आली आहे. उर्वरित जागांवरील निवडणूक घोषीत कार्यक्रमाप्रमाणे होईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती-४, सिंदेवाही-३, कोरपना-३, सावली-३, पोंभूर्णा-४, गोंडपिंपरी-३, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव-४, महागाव-४, कळंब-४, राळेगाव-३, मारेगाव-३, अमरावती जिल्ह्यातील तिवसा-३, भातकुली-१, भंडारा जिल्ह्यातील लाखनी-४, मोहाडी-४, लाखांदूर-४, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी-४, सिरोंचा-३, कुरखेडा-२, अहेरी-१, धानोरा-१, गोंदिया जिल्ह्यातील कुही-४, हिंगणा-४, वर्धा जिल्ह्यातील आष्ठी-४, कारंजा-४, सेलू-४, समुद्रपूर-२, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर-४, वाशिम जिल्ह्यातील मनोरा-४ या ठिकाणची ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक स्थगित झाली आहे.

भंडारा व गोंदियातील ६८ जागांची निवडणूक स्थगित

गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीत ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० , तर पंचायत समितीच्या २० तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ ओबीसी प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button