नागपूर : गोंड गोवारी समाजाचा संविधान चौकात रस्ता रोको | पुढारी

नागपूर : गोंड गोवारी समाजाचा संविधान चौकात रस्ता रोको

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून शांततेत सूरू असलेल्या गोंड गोवारी समाजाच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला. आज (दि.५) दुपारपासून हजारो गोंड गोवारी समाजबांधव या आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एकवटल्याने संविधान चौक सुमारे चार तास ठप्प झाला. सायंकाळीनंतर आंदोलकांनी थेट व्हेरायटी चौकात ठिय्या आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

संविधान चौकात आज दुपारपासून मोठ्या संख्येने गोंड गोवारी समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, अचानक आक्रमक आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता जाम केला. आरबीआय चौक ते झिरो माईल पर्यंत आंदोलकांची गर्दी असल्याने सीताबर्डी परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

२३ नोव्हेंबर १९९४ रोजी हिवाळी अधिवेशन काळात झालेल्या ११४ निष्पाप समाजबांधवांचे प्राण घेणाऱ्या गोवारी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, नारे लावत आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करण्यावर ठाम असल्याने पोलिसांचा नाईलाज झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कुणीही जबाबदार अधिकारी आमची व्यथा ऐकण्यास आले नाहीत. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. दोन नायब तहसीलदार चर्चेला आले, मात्र, आंदोलकांनी त्यांना परत पाठविले.

हेही वाचा 

Back to top button