Nagpur Politics : नागपुरातील भाजपचे जेष्ठ नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत छोटू भोयर यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटू भोयर पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
माजी उपमहापौर व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असलेले डॉ. भोयर काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांनी अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून त्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही, असंही बोलले जात आहे.
डॉ. भोयर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असण्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जुळले आहेत. त्यांच्या बंडखोरीच्या वृत्ताने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, डॉ. भोयर हे पक्षांतराच्या निर्णयावर ठाम होते. डॉ. भोयर यांनी सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे नेते, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. डॉ. भोयर यांच्या पक्षांतराने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर व नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांचे नाव अचानक काँग्रेसकडून नागपूरच्या विधान परिषदेसाठी चर्चेत आल्याने उलट सुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. छोटू भोयर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संघाच्या मुशीत घडलेले छोटू भोयर हे भाजपचे नगरसेवक आहेत. परंतु, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळाली. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातो, असा आरोप करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
गेले काही दिवस नॅाटरिचेबल असलेले भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये बाहेरुन आलेल्यांना संधी मिळाली. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातोय. पक्षात मोठी खदखद आहे, असे आरोप करत छोटू भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमध्ये प्रवेश करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात विधान परिषद निवडणूक लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचे भाचे असलेले छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहे. नासूप्रचे ते विश्वस्त होते. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून कोण, हा प्रश्न कायम आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक डॉ. छोटू भोयर यांचे नाव चर्चेत आले. मुळक यांनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य अशी भूमिका घेतली आहे. वर्धा येथे झालेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान भोयर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचीही चर्चा होती.