चंद्रपूर : ताडोबात माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार | पुढारी

चंद्रपूर : ताडोबात माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

ताडोबा व्याघ्र अभयारण्यामध्ये सुरू झालेल्या वन्य प्राणी गणनेसाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघिनीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ही महिला वनरक्षक ठार झाल्‍याची घटना आज (शनिवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोलारा गेट जवळ घडली. स्वाती नानाजी ढोमणे (वय 31) असे महिला वनरक्षकाचे नाव आहे. महिला वनरक्षक ठार झाल्‍याच्या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली.

19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना

व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यामध्ये 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना होत आहे. प्राण्यांची गणना करण्याकरिता ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम ताडोबा अभयारण्यातील पाणवठ्यावर सुरू आहे. कोलारा गेट जवळील कोअर झोनमध्ये पाणवठा 97 जवळ ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम सुरू होते, त्यामुळे आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे ह्या चौकीदारासह कर्तव्यावर गेल्या.

कोलारा गेट जवळ कोअर झोनमध्ये पाणवठा 97 कडे जात असताना अचानक समोर माया नावाची वाघीण पुढे आली. तिचा रस्ता चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न करताच माया नावाच्या वाघिणीने महिला वनरक्षकावर हल्ला चढविला. वाघिणीने स्‍वाती यांना जंगलात ओढत नेवून ठार केले. त्यानंतर ती वाघिण पळून गेली. नेहमी पर्यटकांना भूरळ घालणा-या ह्या वाघिणीने आज अचानक रौद्र रूप धारण करून वनरक्षकालाच ठार केल्याची माहिती ताडोबात पसरताच एकच खळबळ उडाली.

सदर घटनेची माहिती ताडोबा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पंचनामा करण्यात येत आहे. मृत वनरक्षकाच्या पश्चात पती, एक मुलगी आहे. ती जिवती तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. या घटनेने ताडोबातील वन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button