पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष, फडणवीस सत्ता गेल्याने अस्वस्थ | पुढारी

पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष, फडणवीस सत्ता गेल्याने अस्वस्थ

नागपूर; पुढारी ऑनलाईन

चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, मात्र, देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्याने इतके अस्वस्थ झाल्याचे पाहून आश्चर्य वाटते, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रातील काही शहरांत त्रिपुरामधील दंगलीचे पडसाद उमटले. त्यावरून फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेबाबत त्यांना विचारले असता पवार यांनी टीका केली.

पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील जे काही बोलले ते काही फार मनावर घेण्यासारखे नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, आणि आम्ही देतही नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचे मला आश्चर्य वाटते. एखाद्या संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने बोलावे असे संकेत असतात. ते गांभीर्याने मते व्यक्त करतात, असा माझा समज होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांतील त्यांची मते अतिशय उथळ होती. कोणत्याही संवेदनशील प्रश्नांवर बोलताना निवडणुकीतील मुद्दे लक्षात घेऊन बोलण्याचे टाळावे. सत्ता गेल्यानंतर माणसे अस्वस्थ होतात, हे मला माहीत आहे. ती अस्वस्थता इतक्याही टोकाला गेली आहे. मात्र, वास्तवाचे भान सुटू नये.

देशमुख यांच्या प्रत्येक तासांची किंमत चुकवावी लागेल

नागपूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आठवण काढली. यावेळी पवार हे देशमुख यांच्या विषयी भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. देशमुख यांच्या बद्दल शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख यांनी त्यांच्या बाबत जे घडलं ते मला सांगितलं होतं. त्यामुळे मला वस्तुस्थिती माहित आहे. देशमुख यांना जो त्रास दिला जात आहे. त्या त्रासाचा प्रत्येक मिनिट वसूल केला जाईल, असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला.

शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय संस्थांकडून पक्षातील लोकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईवर टीका केली. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राऊत, एकनाथ खडसे तसेच अजित पवार आणि त्यांच्या बहिणीवर केलेल्या कारवाईचा समाचार यावेळी पवार यांनी घेतला.
यावेळी पवार भावूक होऊन म्हणाले, असे पहिल्यांदाच होत आहे की मी नागपूरला आलो आहे आणि माझ्या सोबत अनिल देशमुख नाहीत. पक्षाच्या स्थापनेनंतर जेव्हा जेव्हा मी नागपूर आलो आहे तेव्हा देशमुख यांनी स्वागत व आदारातिथ्य केलं आहे. देशमुख यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्या बाबत जे घडलं आहे ते त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला आहे. ते फरार आहेत व अनिल देशमुख यांना कोठडीत ठेवण्यात आलं आहे. या जिल्ह्यात देशमुख यांनी राष्ट्रवादी वाढवली आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button