IND vs NZ : रो-हिटला सूर्याची लाभली झळाळी; मालिकेची विजयी सुरुवात | पुढारी

IND vs NZ : रो-हिटला सूर्याची लाभली झळाळी; मालिकेची विजयी सुरुवात

जयपूर : पुढारी ऑनलाईन

 IND vs NZ  : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचे १६५ धावांचे आव्हान भारताने १९.४ षटकात पाच फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४० चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने ३६ चेंडूत ४८ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडलने ठेवलेल्या १६५ धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेची पहिली दोन षटके खेळून काढली. त्यानंतर रोहितने आपला गिअर बदलला. त्यानंतर टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र दरम्यान, केएल राहुल १५ धावांवर बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि सेट झालेल्या रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी १२ व्या षटकातच संघाचे शतक धावफलकावर लावले. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने ५९ धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी ट्रेंट बोल्टने फोडली. त्याने ३६ चेंडूत ४८ धावांची खेळी करणाऱ्या रोहितला अर्धशतकापासून वंचित ठेवले.

रोहित बाद झाल्यानंतर डावाची सुत्रे सूर्यकमुराने आपल्या हातात घेतली. त्याने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत त्याला सावध साथ देत होता. या दोघांनी सामना बॉल टू रन आणला होता. मात्र बोल्टला एक धाडसी फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार ६२ धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर पंत आणि श्रेयस अय्यर भारताला विजयीपथावर नेण्यास सज्ज झाले होते. भारताला १२ चेंडूत १६ धावांची गरज होती. १९ वे षटक टाकणाऱ्या कर्णधार टीम साऊदीने चार चेंडूवर चार धावा दिल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने एक उंच फटका मारात पाचव्या चेंडूवर २ धावा केल्या. सहाव्या चेंडूवरही अय्यरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला आणि तो बोल्टकडे ५ धावांवर झेल देऊन परतला.

आता भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज होती. पदार्पण करणारा व्यंकटेश अय्यर क्रिजवर होता. त्याने चौकार मारत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. सामना ४ चेंडूत ४ धावा असा आला. अक्षर पटेलने एक धाव करुन स्ट्राईक ऋषभ पंतला दिला. अखेर तीन चेंडूत विजयासाठी ३ धावांची गरज असताना पंतने विजयी चौकार मारला.

 IND vs NZ ; रोहित टॉस का बॉस 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने सार्थ ठरवला. त्याने डॅरेल मिचेलचा शुन्यावर त्रिफळा उडवला. यानंतर आलेल्या मार्क चॅपमॅन आणि मार्टिन गप्टील यांनी संघाला पॉवर प्लेमध्ये ४१ धावांपर्यंत पोहचवले. यात चॅपमॅनचे ३० धावांचे योगदान होते.

पॉवर प्लेनंतर गप्टीलनेही आपला गिअर बदलला. या दोघांनी न्यूझीलंडला १० व्या षटकात ६५ धावांपर्यंत पोहचवले. गप्टील आणि चॅपमॅनने दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची शतकी भागीदारी रचत न्यूझीलंडचे १४ व्या षटकात शतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर आर. अश्विनने न्यूझीलंडला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने मार्क चॅपमॅनला ६३ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडची अवस्था १ बाद ११० वरुन ३ बाद ११० अशी केली.

हेही वाचा : भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार; अनुराग ठाकूर म्हणाले….

 IND vs NZ ; गप्टीलचा दांडपट्टा

दुसऱ्या बाजूने आक्रमक पवित्रा घेलेल्या गप्टीलने आपल्या अर्धशतकानंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने न्यूझीलंडला १८ व्या षटकात १५० चा टप्पा पार करुन दिला. मात्र दीपक चाहरने ४२ चेंडूत ७० धावांची खेळी करणाऱ्या गप्टीलला श्रेयस अय्यर करवी झेलबाद केले. शेवटची दोन षटके शिल्लक राहिली असताना भुवनेश्वरने टीम साईफर्टला १२ धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला.

१९ वे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वरने १ विकेट घेत फक्त ५ धावा दिल्या तर २० वे षटक टाकणाऱ्या मोहम्मद सिराजनेही १ विकेट घेत ७ धावा दिल्या यामुळे न्यूझीलंड २० षटकात ६ बाद १६४ धावांपर्यंत पोहचला.

Back to top button