नवी मुंबई : एपीएमसी लाईट हाऊसमध्ये दुकानाला आग | पुढारी

नवी मुंबई : एपीएमसी लाईट हाऊसमध्ये दुकानाला आग

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा

एपीएमसी दाणा मार्केट समोर असलेल्या लाईट हाऊसच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या दुकानाच्या गाळ्याला शॉर्टसर्किटने आज (दि. १७) दुपारी पावणे तीन वाजता आग लागली आहे. यामध्ये कुणीही जखमी झाले नाहीत.

वाशी एपीएमसी मार्केट सेक्टर 19, प्लॉट नंबर 14, मर्चंट चेंबर जवळ, के लाईट हाऊसमध्ये आग लागली. ही माहिती कळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख शरद आरदवाड आणि फायर अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी पाच अग्निशमन केंद्रावरून सात गाड्या पाचारण केल्या. सुमारे अडीच तास ही आग धुमसत होती. या आगीत इलेक्ट्रॉनिक सामान पूर्णता जळून खाक झाले. संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभागाने केले असून आग आटोक्यात आणण्यात यश आले.

दिवाळी सणाच्या काळात किरकोळ स्वरूपाच्या 15 आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर अग्निशमन विभागाने इमारती, टॉवर, हॉटेल व्यावसायिकांना नोटीसा पाठवून फायर फायटिंगची अधिकृत परवानगी घेतल्याचे प्रमाणावर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी अद्याप यंत्रणा बसवली नाही. आणि ज्यांनी यंत्रणा बसवली पण कार्यान्वित केली नाही. अशावर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शरद आरदवाड यांनी दिली. दर सहा महिन्यानी यंत्रणेची संबंधित संस्थेकडून तपासणी करणे बंधनकारक आहे. ती झाल्यानंतर त्याचा अहवाल अग्निशमन विभागाला दिला पाहिजे. त्यावर अग्निशमन विभागाकडून प्रमाणावर दिले जाते. मात्र अनेकदा अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्वांची यादी तयार करून त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

Back to top button