नागपूरात जमावबंदी आदेश लागू, अफवा पसरवणाऱ्यांवर हाेणार कारवाई | पुढारी

नागपूरात जमावबंदी आदेश लागू, अफवा पसरवणाऱ्यांवर हाेणार कारवाई

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील घटनेनंतर आता पोलीसांनी नागपूरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. रविवारी (दि. १४) मध्यरात्री १२ वाजल्यापासून नागपूरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आला.  कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची  भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केला आहे. आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम १४४ (१) नुसार कारवाई केली जाणार आहे. नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

शहरात जवळपास ३१ संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. धार्मिक भावना भडकवणारी अफवा पसरवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही अमितेश कुमार यांनी स्‍पष्‍ट केले.

शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये जमावाला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या. राज्य सरकारने या घटनांची गंभीर दखल घेत अमरावती येथे कलम १४४ लागू केले. नागपुरातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने अमितेश कुमार यांनी रविवारी नागपूर शहरात कलम १४४ लागू केले आहे.

सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहर आयुक्तालय अंर्तगत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजवणी करण्याकरिता हा मनाई आदेश लागू केला आहे. त्रिपुरा येथील घटनेचे अमरावती, नांदेड आणि मालेगाव आदी ठिकाणी पडसाद उमटले होते. त्रिपुरा राज्यात काही संघटनांकडून एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरूबाबत आपत्तीजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात १२ नोव्हेंबरला रजा अकादमी, इस्लामिक ऑर्गनायझेशन, अलहज मोहम्मद सय्यद नुरी आदी संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. नांदेड, अमरावती, मालेगाव, फुसाड, कारंजा या ठिकाणी दगडफेक व जाळपोळसारख्या अन्य तीव्र घटना समोर आल्या.

हेही वाचलं का? 

 

Back to top button