चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतशिवारात आढळल्या हत्तीच्या पाऊलखुणा; वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन | पुढारी

चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतशिवारात आढळल्या हत्तीच्या पाऊलखुणा; वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंदिया व गडचिरोली पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यात हत्तींचे आगमन झाले आहे. सावली तालुक्यातील पाथरी,व्याहाड खुर्द शेतशिवारात शुक्रवारी (दि.११) हत्तींच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. पाऊलखुणा आढळून आल्या, मात्र हत्ती कुठेही आढळून आले नाहीत. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी, व्याहाड खुर्द, सावली उपवनात वनविभागाने शोध मोहीम सुरू केली आहे.

सावली तालुक्यात वनविभागाच्या पाथरी उपवनात पहिल्यांदाच हत्तीच्या पाऊलखुणा आढळून आल्या. व्याहाड खुर्द उपवनात पाऊलखुणा आढळून आल्याने सावली वनपरिक्षेत्रात हत्तीचा शिरकाव झाल्याचे बोलले जात आहे. हत्ती ब्रम्हपुरी रेंजमधून हळदा, उसरपार चक मार्गे आल्याचे सांगितले जात आहे. गायडोंगरी गावाजवळील तलाव परिसरात हत्ती दिसल्याचे गावातील प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. त्यानंतर चकविरखल, नवेगाव बिटातुन हत्ती व्याहाड खुर्द उपवनात आल्याचे त्या शेतशिवारातील पाऊलखुणावरून दिसून येत आहे. खरीप हंगामातील सावली तालुक्यात नुकतीच पेरणी झाली आहे. त्यामुळे हत्तीच्या आगमनाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्तीसगड, मध्यप्रदेश मधून काही महिन्यांपूर्वी मुरुमगाव, धानोरा.मार्गे हत्तीच्या कळपाचे आगमन झाले होते. त्यामधील भरकटलेला हत्ती असावा असे वनविभागाकडून सांगितले जात आहे. हत्तीचा त्वरीत शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी, गावकऱ्यांनी केली आहे. सावली वनपरिक्षेत्रात जंगली हत्तीच्या पाऊल खुणा आढळून आल्याने हत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. शिवाय जिवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण विरुटकर यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button