गोवा : पोलिसांचे कॅसिनो कनेक्शन उघड; कुडचडे पोलिस ठाणे रडारवर | पुढारी

गोवा : पोलिसांचे कॅसिनो कनेक्शन उघड; कुडचडे पोलिस ठाणे रडारवर

विशाल नाईक

मडगाव : ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याने समाजाचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पोलिसच पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणार्‍या पोलिस अधिकारी आणि कॉन्स्टेबल विकास कौशिक यांच्या निलंबनानंतर आता कुडचडे पोलिस ठाणेही रडारवर आले आहे. कुडचडे पोलिस ठाण्याशी निगडित पोलिसांचे कॅसिनो कनेक्शन उघड झाले असून हवालदारासाहित कित्येक पोलिस शिपाई बेकायदा कॅसिनो उघडून व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घेतल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईपासून वाचण्यासाठी या पोलिसांची जोरदार धावपळ सुरू आहे.

व्होडलेमल काकोडा येथील मोंतेश होनेक्री नावाचा युवक कॅसिनो मालकांच्या धमक्यांना घाबरून गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्या कॅसिनोत हरलेले दहा लाख रुपये परत करण्यासाठी धमक्या येऊ लागल्याने त्याच्या वृद्ध वडिलांना आपले घर दहा लाख रुपयांना गहाण ठेवावे लागल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ मधून प्रसिध्द झाले होते. या पार्श्वभूमीवर अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.

अधिकार्‍यांनी अकस्मात पाहणी करावी…

बेकायदा कॅसिनोचे व्यवहार खुद्द पोलिसच चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील कित्येक पोलिस हे कुठे ड्युटी करतात याचा थांगपत्ताच नाही. त्यांना कामातून पूर्ण सूट देण्यात आल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी अकस्मात पाहणी केल्यास बर्‍याच जणांचे पितळ उघडे पडणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

कुडचडे पालिका क्षेत्रात खुद्द पोलिसांचे सात ते आठ कॅसिनो चालत आहेत तर तिळामळ आणि केपे शहरापर्यंत त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढली आहे. भागीदार घेऊन कॅसिनो चालवले जात असल्याने त्यांची नावे कुठेही झळकत नाही. अजय नावाचा पोलीस शिपाई थेट कोलवापर्यत कॅसिनोचे व्यवहार चालवत आहे. नुकतेच निलंबित करण्यात आलेल्या विकास कौशीक यांच्याशी त्याचे साटेलोटे असल्याचीही चर्चा आहे. काकोडा येथील एक युवक चार महिन्यांपासून गायब असल्याचा प्रकार दै. पुढारीमधून उघडकीस आल्यानंतर कॅसिनोच्या व्यवहारात गुंतलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसच राजकीय आशीर्वादाने सुमारे पंधरा कॅसिनो चलावत आहेत. त्यांची कमाई लाखोंच्या घरात आहे. या कमाईचा एक भाग एका राजकारण्यालाही जात आहे. पण या व्यवहारात अडकून कुडचडे, सावर्डे आणि केपे भागातील कित्येक घरे मात्र उद्ध्वस्त झाली आहेत.  ग्रामस्थ रूपेश काकोडकर यांनी या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता पोलिस असे अवैध कृत्ये करू लागल्यास सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काकोड्यात एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपले घर गहाण ठेवावे लागले. यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट असू शकत नाही. त्या पोलिसाने ते सर्व पैसे त्याला परत करावेत. अन्यथा पोलिस स्थानकावर मोर्चा आणला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मटक्याचा व्यवसाय

काही पोलिस कॅसिनोत गुंतले आहेत तर काहीजण मटक्याचा व्यवसाय करत आहेत. अशा पोलिसांना ड्युटी माफ केली जाते. त्यांना त्यांच्या कामकाजातून सूट देण्यामागे कोणते कारण आहे का, याची पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी चौकशी करावी, अशी मागणी कुडचडेतील ग्रामस्थांनी केली आहे.

विधानसभेत ऑनलाईन कॅसिनोंबाबत कारवाईची मागणी

विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ घेऊन कुंकळ्ळीत सुरू असलेल्या ऑनलाईन कॅसिनोवर कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले. कुडचडेत बेकायदा ऑनलाईन कॅसिनो सुरू असून त्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button