भंडारा : शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप | पुढारी

भंडारा : शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : साकोली येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने बाळाला जन्म दिला. परंतु, प्रकृती बिघडल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

साकोली तालुक्यातील मुंडीपार/सडक येथील महिलेला प्रसुतीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. २८ जुलै रोजी डॉक्टर चारुलता गायधने, डॉक्टर गायधने व डॉक्टर अली या तिघांनी महिलेचे शुक्रवारी सकाळी दहा वाजता सिजर केले.

त्यानंतर अचानक महिलेची प्रकृती खालावली. यावेळी महिलेच्या पती व नातेवाईकांनी डॉक्टरांना प्रकृती खराब झाल्याचे सांगूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, आज शनिवारी (दि.२९) पहाटे पाच वाजता महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले. दोषी डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय प्रेत उचलणार नाही, असा नातेवाईकांनी पवित्रा घेतला. यातील दोषी डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा;

Back to top button