BJP National Executive | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी | पुढारी

BJP National Executive | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपने एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस आणि १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काही नेत्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या नावांचा त्यात समावेश आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना कायम ठेवण्यात आले असून सचिव पदी विजया रहाटकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलूगुरू आणि उत्तर प्रदेशचे आमदार तारीक मन्सूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणाचे भाजपचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांचाही समावेश भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत केला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिल अँटनी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांचा समावेश राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आला आहे.

काही नेत्यांना मात्र नवीन कार्यकारिणीतून वगळ्यात आले आहे. कर्नाटकमधील पक्षाचे नेते सी. टी. रवी व आसाममधील लोकसभा खासदार दिलीप साकिया यांचा कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. पक्षाचे बिहारमधील लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनाही पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button