भारत-पाक क्रिकेट सामना हा राष्‍ट्रहिताच्‍या विराेधात : रामदेव बाबा | पुढारी

भारत-पाक क्रिकेट सामना हा राष्‍ट्रहिताच्‍या विराेधात : रामदेव बाबा

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा :

सद्य परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणे राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माविरूद्ध आहे. एकीकडे क्रिकेट आणि दुसरीकडे दहशतवादाचा खेळ एकाचवेळी होऊ शकत नाही, अशी टीका योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते विमानतळावर बोलत होते. या वेळी उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत बोलणे त्यांनी टाळले.

बॉलिवुडमधील नशेचा खेळ युवा पिढीसाठी धाेकादायक

बॉलिवुडमध्ये सुरू असलेला नशेचा विनाशकारी खेळ देशाच्या युवा पिढीसाठी धाेकादायक आहे. व्यसनाला अशा पद्धतीने ग्लॅमराईज करणे चुकीचे आहे. आपले रोल मॉडेल, आयकॉन आणि आयडियल मानणाऱ्या स्टार्सना अशा प्रकारच्या कारस्थानात फसलेले पाहून लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून इंडस्ट्रीतील कचरा साफ केला पाहिजे. कारण त्यांच्यासाठीही हे आत्मघातकी ठरेल, असे बाबा रामदेव म्हणाले. मी योगापासून रोगमुक्ती, नशा मुक्ती, सर्व प्रकारची साधन शुचिता, अनैतिकता मुक्तीची मोहीम चालवतो, असेही त्‍यांनी सांगितले.

काळेधन, भ्रष्टाचार, व्यवस्था परिवर्तनासंबंधी आम्ही संपूर्ण देशात आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी मी काही उपाय सांगितले होते. वेगवेगळ्या आर्थिक सुधारणांसोबतच क्रुड ऑइलच्या दरांनुसार पेट्रोलची विक्री केली जावी, त्यावरील कर कमी करण्यात यावा आदी उपाय सांगितले होते.सरकारला आपली अर्थव्यवस्था मजबूत करतानाच राष्ट्र हिताचे सामाजिक उपक्रम सुरू ठेवायचे आहेत. सरकार समोर वेगवेगळी आर्थिक आव्हाने आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

त्यांना सरकारही चालवायचे आहे. म्हणून ते कर कमी करू शकत नाही, अशी मल्लीनाथीही रामदेव यांनी केली. पण, कधी ना कधी पेट्रोल डिझेलचे दर कमी होईल, असे भाकीतही त्‍यांनी वर्तवले. ॲलोपॅथीच्या तुलनेत योग आणि आयुर्वेद आजही सर्वश्रेष्ठ आहे. तातडीचे उपचार आणि शस्रक्रिया वगळता ९८ टक्के रोगांचा परिणामकारक आणि स्थिर उपचार योग आणि आयुर्वैदात होतो. पतंजलीने एकात्म उपचार पद्धती विकसित केली आहे. पतंजलीचा नागपुरातील फूडपार्क यावर्षी सुरू करू असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button