कोरोना लसींच्या अतिरिक्‍त उत्पादनाचे करायचे काय? | पुढारी

कोरोना लसींच्या अतिरिक्‍त उत्पादनाचे करायचे काय?

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कोरोना वरील लसीकरणाच्या 100 कोटी डोसेसचा टप्पा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करणार्‍या लस निर्मात्या कंपन्यांपुढे आता लसीच्या अतिरिक्‍त उत्पादनाचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लसीकरणाची गरज ओळखून उत्पादन क्षमतेत केलेली वाढ आणि बाहेरील देशांमध्ये लस मंजुरीला होणारा विलंब यामुळे लस निर्मात्यांमध्ये चिंतेचा सूर उमटत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आता थेट जागतिक आरोग्य संघटनेलाच साकडे घातले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ओकोन्जो इव्हेला हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. राजधानी दिल्लीमध्ये त्यांनी देशातील विविध उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जगाला मोठा दिलासा देणार्‍या भारतातील लस निर्मात्या कंपन्यांबरोबरही एक विशेष बैठक घेतली.

या बैठकीत भारत बायोटेकच्या संचालिका सुचित्रा इला, पॅनासिया बायोटेकचे कार्यकारी संचालक राजेश जैन, बायॉलॉजिकल ई-चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मेती यांच्यासह विविध लस निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत संबंधितांनी जगातील विविध देशांमध्ये लसीच्या अत्यावश्यक वापराच्या मंजुरीसाठी होत असलेल्या विलंबाकडे ओकोन्जो इव्हेला यांचे लक्ष वेधले. अशा मंजुरीच्या विलंबामुळे लसीकरणाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करताना निर्मात्यांनी याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.

भारत हा कोरोना लसीकरणात जगातील सर्वात अव्वल देश ठरला आहे. जगाच्या पाठीवर 100 कोटी डोसचे उद्दिष्ट पूर्ण करणारा अद्याप एकही देश नाही. भारतामध्ये कोरोना महामारीने टोक गाठल्यानंतर देशावरील या संकटातून मुक्‍त होण्यासाठी केंद्र सरकारने लस निर्मात्या कंपन्यांना मोठे योगदान देण्याचे आवाहन केले होते.

भारताची अवाढव्य लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण प्रक्रिया राबविण्यासाठी लसीचे उत्पादन वाढविण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले होते. यानुसार लस निर्मात्या कंपन्यांनी आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये मोठी वाढ केली.

निर्यातीला विलंब

एका बाजूला लसीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना बाहेरील देशांमध्ये लसीच्या वापरासाठी अत्यावश्यक वापराच्या मंजुरीला मोठा विलंब होत आहे. यामुळे लस निर्मात्यांना लसीची निर्यात करण्यातही मोठे अडथळे आहेत.

Back to top button