भारत-पाकिस्तान सामना : ‘है तैयार हम…!’ | पुढारी

भारत-पाकिस्तान सामना : ‘है तैयार हम...!’

निमिष पाटगावकर

एखाद्या प्रख्यात गायकाचा ‘स्टेज शो’ असतो तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी पहिल्यांदा काही होतकरू गायक आपली कला सादर करतात आणि मग त्या महागायकाचे स्टेजवर पदार्पण होते. तसेच, या टी-20 विश्‍वचषकातही पात्रता फेरीतील होतकरू संघांनी आपली कला दाखविल्यावर आज या स्पर्धेच्या दुसर्‍याच दिवशी मुख्य कलाकारांचा भारत-पाकिस्तान सामना हा ‘महासंग्राम’ होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना हा कुठच्याही स्पर्धेचा मेरूमणी असतो. मग तो विश्‍वचषक असो वा आशिया चषक किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी. याचमुळे ऑस्ट्रेलिया – द. आफ्रिका आणि इंग्लंड – वेस्ट इंडीज या सामान्यांनी मुख्य स्पर्धेचा बिगुल काल वाजला तरी आजच्या महासंग्रामाकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे.

क्रिकेटबरोबरच भावनिक, राजकीय, धार्मिक अशा अनेक छटा घेऊन प्रत्येक भारत-पाकिस्तान सामना रंगत असतो आणि आजचा सामनाही त्याला अपवाद नाही. बाकीचे सर्व रंग बाजूला ठेवून आपण निव्वळ क्रिकेटचा विचार केला तर आज ‘मौके पे चौका’ कोण मारेल? संघांची ताकद, समतोलपणा आणि अनुभव पाहता भारताचा संघ नक्‍कीच वरचढ आहे; पण भारताशी खेळताना पाकिस्तान एका वेगळ्याच जिद्दीने खेळतो.

इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघाने आयपीएलसाठी दुबई गाठली. त्यामुळे भारतीय संघ या वातावरणाला, मैदानांना चांगलाच रुळला आहे. आयपीएलच्या निमित्ताने भारतीय संघाला टी-20 सामन्यांचा उत्तम सराव झाला आहे. या उलट पाकिस्तान संघाच्या जुलै-ऑगस्टमधल्या वेस्ट इंडीज दौर्‍यांनंतर त्यांना स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळालेले नाही. विश्‍वचषकाच्या सराव सामन्यांचे निकाल हे विचारात घ्यायचे नसतात; पण भारताचे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाबरोबरचे आणि पाकिस्तानचे द. आफ्रिका, वेस्ट इंडीजबरोबरचे सामने बघितले तर पुन्हा भारताची तयारी उजवी वाटते.

भारताची फलंदाजी अनेक पर्यायांनी बहरली आहे. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला असतील; पण ईशान किशनने सशक्‍त तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत येतील. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजी करायच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह कायम असले तरी एक फलंदाज म्हणून तो खेळायची शक्यता आहे. कारण, तो एक उत्तम ‘फिनिशर’ आहे. रवींद्र जडेजा, बुमराह, शमी हे खेळाडू संघात असतील. हे नऊ खेळाडू जवळपास नक्‍की असल्याने प्रश्‍न उरेल तो भुवनेश्‍वर कुमार की शार्दुल ठाकूर आणि राहुल चहर की अश्‍विन यांचा.

दुबईच्या मैदानात ज्या उपलब्ध खेळपट्ट्या आहेत, त्या जलदगती गोलंदाजांना पूरक आहेत. भुवनेश्‍वर कुमारला इथे स्विंग मिळणार नसल्याने एक अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर हा जास्त योग्य पर्याय वाटतो. त्याची गोलंदाजी भेदक नसेल; पण मोक्याच्या क्षणी विकेट काढायचे त्याचे कसब आपण आयपीएलच्या अंतिम सामन्यातही पाहिले.

दुबईच्या मैदानातील कुठच्या खेळपट्टीवर हा सामना होतोय त्यावरही गोलंदाजीचे पर्याय निवडावे लागतील. जर मध्यवर्ती खेळपट्टी नसेल तर एका बाजूला सीमारेषाजवळ असेल व त्याचा दबाव फिरकी गोलंदाजांवर असेल. या परिस्थितीत अनुभवी अश्‍विन जास्त उपयुक्‍त ठरेल. डावखुर्‍या फखर झमानला जखडून ठेवायला अश्‍विनला डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी देण्याचा डावपेचही आपण रचू शकतो. हा सामना संध्याकाळचा आहे तेव्हा दव हा एक मोठा घटक असेल. ज्यावर नाणेफेक जिंकून काय करायचे हे अवलंबून असेल आणि त्याचबरोबर जास्तीचा फिरकी गोलंदाज खेळवायचा का जलदगती हे ठरेल.

दुसरीकडे पाकिस्तान संघाची मुख्य मदार आहे ती फलंदाजीत बाबर आझमवर. आज बाबर आझमचे नाव जगातल्या उत्तम फलंदाजांच्या यादीत यायला लागले आहे. त्याला साथ द्यायला फखर झमान आणि हैदर अली असतील. मोहम्मद हाफीज आज चाळीस वर्षांचा आहे, तर शोएब मलिक 39 वर्षांचा आहे; पण या बुजुर्गांवरच पाकिस्तानच्या मधल्या फळीचा डोलारा आहे. पाकिस्तानचा फलंदाजीचा कणा मोडायला आपल्याला बाबर आझमला लवकर बाद करावे लागेल. पाकिस्तान हा जलदगती गोलंदाजांचा कारखाना आहे.

शाहिन आफ्रिदी, हसन अली आणि हॅरिस रौफ या जलदगती त्रिकुटावर त्यांची गोलंदाजीची भिस्त आहे. उत्तम डावखुरा जलदगती गोलंदाज भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावत आला आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहम्मद अमीर – हसन अली किंवा 2019 च्या विश्‍वचषक अंतिम सामन्यात बोल्ट-हेन्‍री या डाव्या-उजव्या जोड्यांनी आपल्या याच भारतीय फलंदाजीला नामोहरम केले होते.

तेव्हा पाकिस्तानला आफ्रिदी-अली जोडीकडून हीच अपेक्षा असणार. इमाद वसीम आणि शादाब खान हे फिरकीपटू भारतीय फलंदाजांना खेळायला अवघड जातील असे वाटत नाही. पाकिस्तानचा संघ गुणवान आहे; पण तो बेभरवशाचा आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या रद्द केलेल्या दौर्‍यांनी त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा सराव नाही.

या विश्‍वचषकानंतर विराट कोहली टी-20 चे कर्णधारपद सोडणार आहे, रवी शास्त्रीचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल संपेल तेव्हा आयसीसी ट्रॉफी जिंकून कर्णधारपद सोडायला कोहलीला नक्‍कीच आवडेल. मात्र, तितकेच महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे हे असेल. विश्‍वचषक कसा जिंकायचा, याच्या चार युक्त्या शिकवायला जोडीला धोनीही आहेच, तेव्हा कोहली आणि धोनी या ‘फायर अँड आइस’ कॉकटेलमधून पाकिस्तानविरुद्ध ‘मौके पे चौका’ मारायला भारतीय संघ सर्वांगाने तयार आहे.

Back to top button