राष्ट्रवादीच्या बैठकीतूनच अजित पवारांचा उदयसिंहांना फोन | पुढारी

राष्ट्रवादीच्या बैठकीतूनच अजित पवारांचा उदयसिंहांना फोन

सातारा : हरीष पाटणे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघात वाढलेला तिढा शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही सुटला नाही. अजितदादांनी बैठकीतूनच उदयसिंह पाटील यांना फोन लावून सोसायटी मतदार संघातून लढण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे वडील विलासकाका उंडाळकर यांचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने मी तो सोडू शकत नाही.

आपण सहकारमंत्र्यांना अन्य मतदार संघातून उभे राहण्यास सांगावे, असे उदयसिंहांनीच अजितदादांना सुचवले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही याच बैठकीत आपण सोसायटीमधूनच लढणार असल्याचे ठासून सांगितले. याच बैठकीत खा. उदयनराजे भोसले यांच्या गृहनिर्माण मतदारसंघातून त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय झाला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला अचानकपणे अजितदादांना उपस्थित राहता आले नव्हते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी 5-5 जागांची मागणी केली. शनिवारी हीच बैठक पुढे कंटीन्यु झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री ना. अजित पवार उपस्थित होते. पुणे विश्रामगृहावर सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी प्रत्येकाला स्वतंत्र वेळ दिला.

बैठकीच्या सुरुवातीलाच आ. शिवेंद्रराजे भोसले व ज्ञानदेव रांजणे यांनी स्वतंत्रपणे बोलण्याची परवानगी मागितली. त्यानुसार ना. अजितदादा, ना. रामराजे ना. निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील यांच्यासमोर रांजणे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याविषयी तक्रार केली. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.

माझी पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेची सदस्य आहे. आम्ही फक्‍त विधान सभेला आ. शिवेंद्रराजेंचे काम केले अन्यत्र आम्ही राष्ट्रवादीबरोबर राहिलो आहोत. असे असताना आ. शशिकांत शिंदे आम्हाला डिस्टर्ब करत आहेत. माझ्याकडे 35 मतदार आहेत आणि जावली सोसायटी मतदार संघातून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी इच्छुक आहे, असे रांजणे यांनी ना. अजितदादांना सांगितले. रांजणेंनी 35 मतदारांचा हवाला दिल्यानंतर अजितदादाही अवाक् झाले.

‘तुमच्याकडे 35 लोक असतील तर मग कशाला थांबताय? तुम्हीच लढा, असे अजितदादा म्हणताच बैठकीत एकदमच सन्‍नाटा पसरला. लगेचच ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांनी अजितदादांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘असे करुन चालणार नाही, आपण शशिकांत शिंदे यांच्याशीही बोलू, काही चुकत असेल तर सगळे मिळून सांगू,’ असे अन्य नेत्यांनी अजितदादांना सांगितले.

त्यावर आ. शिवेंद्रराजेंनी माझ्या मतदार संघात कुणी ढवळाढवळ करता कामा नये. आ. शशिकांत शिंदे हे पक्षाचे काम करतात, असे म्हणत असतील तर मग सौरभ शिंदे का पडला? असा सवालच शिवेंद्रराजेंनी केला. त्यानंतर अजितदादांनी स्वतंत्रपणे आ. शशिकांत शिंदे यांच्याशीही चर्चा केली. शशिकांत शिंदे यांच्याविषयी रांजणे यांच्या तक्रारीबाबत अजितदादांनी आ. शिंदे यांना सांगितले.

जावलीत आपण पक्षाचेच काम केल्याचे स्पष्टीकरण आ. शिंदे यांनी दिले. शिवेंद्रराजेंना डिस्टर्ब करण्याचा कोणताही हेतू नाही. माझे आणि शिवेंद्रराजेंचे आता पॅचअप झाले आहे आणि रांजणे जे सांगत आहेत तेवढी माणसे त्यांच्याकडे नाहीत. माझ्याकडेही लोक आहेत, असे आ. शिंदे यांनी सांगितले. त्यावर तुम्ही, रामराजे, पालकमंत्री, आ. शिवेंद्रराजे बसून निर्णय घ्या आणि तातडीने तोडगा काढा. शिवेंद्रराजेंनी सांगितले तर रांजणे थांबतील, असे अजितदादांनी सांगितले.

बैठकीत कराड सोसायटी मतदार संघाचा विषय आला. बाळासाहेब पाटील यांनी आपण सोसायटी मतदार संघातून लढणार असल्याचे व गणित आपल्या बाजूने असल्याचे सांगितले. बैठकीतूनच अजितदादांनी स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांना फोन लावला. तुम्हाला अ‍ॅडजेस्ट करता येईल, तुम्हाला सोसायटी ऐवजी अन्य मतदार संघातून दिले तर काय हरकत आहे, असे अजितदादांनी उदयसिंहांना सांगितले. मात्र, हा मतदार संघ माझ्या वडिलांचा पारंपारिक मतदार संघ आहे. तो मी सोडू शकत नाही.

पॅनलबरोबर राहण्याची माझीही इच्छा आहे. मी आपला आदर करतो. उलट आपणच सहकारमंत्र्यांना अन्य मतदार संघातून उभे करुन मला सोसायटीतून संधी द्यावी, अशी अपेक्षा उदयसिंहांनी व्यक्‍त केली. तिढा न सुटल्याने रामराजे तुम्ही, पृथ्वीराज बाबा, बंटी पाटील असे मिळून निर्णय घ्या. मात्र, ही लढत शक्यतो टाळा, असा सल्‍ला अजितदादा यांनी दिला.

बैठकीत गृहनिर्माण मतदार संघावरही चर्चा झाली. उदयनराजेंच्याविरोधात उमेदवार देण्याचा निर्णयही झाला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांना तातडीने उमेदवार उभा करण्याच्या सूचना बैठकीत झाल्या. शिवेंद्रराजेंनी ओबीसी, एनटी, बँका-पतसंस्था व अन्य एक अशा स्वत:सह पाच मतदार संघांची पुन्हा मागणी केली. माण – खटावच्या मुद्यावरही घासून चर्चा झाली. अन्य मतदार संघांबाबतचा निर्णय जिल्ह्याच्या पातळीवर घेण्यात यावा. दि. 25 तारखेला पॅनलचे फॉर्म भरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पुन्हा बैठक घेवून जिल्हा मध्यवर्ती बँक बिनविरोध कशी होईल यावर सविस्तर व उमेदवारनिहाय चर्चा झाली.

* उदयसिंह म्हणाले, पालकमंत्र्यांना इतर मतदारसंघातून उभे करा, मी पॅनेलबरोबरच
* रांजणेंचा आ. शशिकांत शिंदेंविरोधात तक्रारीचा पाढा
* आ. शिवेंद्रराजेंकडून ओबीसी, एनटी, बँका-पतसंस्था मतदारसंघांची मागणी
* सत्ताधारी पॅनेल उद्या एकत्र अर्ज दाखल करणार

Back to top button