'समीर वानखेडे यांच्या चौकशी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.... | पुढारी

'समीर वानखेडे यांच्या चौकशी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले....

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा :

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे महाराष्ट्राचे प्रमुख असलेले समीर वानखेडे हे केंद्रीय एजन्सीचे अधिकारी असल्याने राज्य सरकार त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपुरात सांगितले. ते दोन दिवसीय दौऱ्यावर नागपूरला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होत. नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

समीर वानखेडे चौकशी : मला काहीच माहीत नाही

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. एवढचं नाही तर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की या संदर्भात मला काहीही माहिती नाही. त्यांनी अद्याप कोणतेही पुरावेदेखील दिलेले नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना परमबीर सिंग कुठे आहेत, या संदर्भात विचारले असता त्यांनी हसत-हसत उत्तर देताना ते म्‍हणाले की, परमबीर सिंग कुठे आहेत, हे मला देखील माहिती नाही. तसेच शिरूर आणि औरंगाबाद येथे घडलेल्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. पोलिसांमार्फत या घटनांचा तपास सुरू झालेला आहे.

तपास जलदगतीने पूर्ण व्हावा आणि तत्काळ आरोपींना अटक व्हावी, याकरिता पोलीस विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. आरोपी नक्की पकडले जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. शिरूर येथील घटनेपूर्वी आरोपींनी रेकी केल्याची माहिती समोर आली असून त्याच परिसरातील गुन्हेगार यामध्ये सहभागी असावेत, असा संशय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Back to top button