नागपूर : कोराडीत नव्या वीज संचाना विरोध जनसुनावणीत राडा, समर्थक-विरोधक भिडले | पुढारी

नागपूर : कोराडीत नव्या वीज संचाना विरोध जनसुनावणीत राडा, समर्थक-विरोधक भिडले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाजनकोमार्फत कोराडीत आधीच 2190 मेगावॅट वीज निर्मिती होत असताना १३२० मेगावॅट्चे दोन नवे युनीट सुरु करण्याचा प्रस्तावाच्या विरोधावरून आजची जनसुनावणी वादळी ठरली. यानिमित्ताने विरोध करणारे काँग्रेस, पर्यावरणवादी,जनमंच एकीकडे तर दुसरीकडे भाजप समर्थक, प्रहार संघटना दुसरीकडे असे घोषणायुद्ध रंगले, काही वेळानंतर प्रकरण हातघाईवर आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले. राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा झाला आहे.

सोमवारी भर उन्हात कोराडी येथे होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी गेले काही दिवस केली जात होती. मात्र, महानिर्मितीने पाणी, कोळसा, रेल्वे यंत्रणा सारे असल्याने याच ठिकाणी ऊर्जा प्रकल्प करण्याची भूमिका कायम ठेवल्याने आज विरोधक एकवटले. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, संदेश सिंगलकर, उमाकांत अग्निहोत्री विरोध करणाऱ्यांमध्ये समोर होते.

तत्पूर्वी,‘नागपूर-कोराडी क्लाईमेट क्राईसेस’ या संस्थेच्या पदाधिका-यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. दरम्यान, हा विरोध करणारे बाहेरचे लोक आहेत. केवळ राजकारणातून विरोध होत आहे. परिसरातील ९० टक्के लोक या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. १३ ग्रामपंचायतीनी समर्थनात ठराव पारित केले असल्याचा दावा महादूलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केला. भाजप ऑरेंज सिटीची ओळख जगाच्या पाठीवर ‘कॅन्सर सिटी’ म्हणून होईल, असा दावा परिसरातील ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय संघटना, पर्यावरणवाद्यांनी स्थापित केलेल्या ‘नागपूर-कोराडी क्लाईमेट क्राईसेस’ या संस्थेच्या पदाधिका-यांनी केला.

आधीच कोराडीच्या विद्युत निर्मितीची क्षमता ही लोकसंख्येच्या मानाने अत्यधिक आहे. सध्या २६०० आणि २०० मेगावॅट वीज निर्मिती होत असताना पुन्हा दोन्ही युनिट्समध्ये ६६० मेगावॉट्स वीज निर्मिती म्हणजे नागपूर शहर हे लवकरच तापमानाच्या आणि प्रदुषणाच्या बाबतीत चंद्रपूरच्याही पुढे जाईल व घरोघरी कॅन्सरसह विविध आजारांचे रुग्ण दिसतील अशी भयावह परिस्थिती विरोधक मांडत आहेत. विशेष म्हणजे हा प्रस्ताव २०१९ मध्येच तत्कालीन सरकारकडून आणण्यात आला त्याच वेळी या प्रकल्पाला विरोध झाला. पुढे महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. त्यांच्यापर्यंत या प्रकल्पांमुळे विदर्भावर होणा-या गंभीर पर्यावरणीय प्रदुषणाचा मुद्दा गेला, तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तो मुद्दा मान्य केला व हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. मात्र, सत्ता बदल होताच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा हा प्रस्ताव पुढे केला असा आरोप विरोधकांचा आहे.

आधीच दोन्ही कोळश्‍यावर चालणा-या थर्मल पॉवर प्लान्ट्समुळे कोलार नदी प्रदूषित झाली असून तेच प्रदूषित पाणी कन्हान नदीमध्ये मिसळत आहे. कन्हान नदी नागपूर शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करते, यात आणखी वाढ होऊन याच दोन्ही संचामध्ये १३२० मेगावॅट वीजेची निर्मिती झाल्यास किती हजार टन राख निर्माण होईल?ती राख अखेर कशी नष्ट करणार आहेत?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

संपूर्ण जगात कुठेही ३० लाख लोकसंख्या असणा-या शहरात ७ हजार २४० मेगावॉट वीज निर्मितीचे प्रकल्प नाहीत मग नागपूर शहरातच हा अट्टहास का ? विशेष म्हणजे कोराडी व चंद्रपूरमधून जेवढी वीज निर्मिती होते त्यातील ७३ टक्के वीज ही पुणे, ठाणे, नाशिकसारख्या पश्‍चिम महाराष्ट्रातील उद्योगांना व लोकसंख्येला पुरविली जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात वीज निर्मिती करणारे एक ही थर्मल पॉवर प्लान्ट नाहीत, कोराडी व विदर्भाचे प्रदूषण वाढवण्या ऐवजी उपमुख्यमंत्री हा प्रस्ताव पश्‍चिम महाराष्ट्रात का घेऊन जात नाही? असा रोखठोक सवाल करीत, या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनमंच अध्यक्ष राजीव जगताप यांनीही या प्रकल्पाला विरोध केला.

विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष ॲड.मुकेश समर्थ, सचिव दिनेश नायडू, विदर्भ इनव्हायरमेंटल एक्शन ग्रुपचे अध्यक्ष आर. बी. गोयंका, समन्वयक सुधीर पालीवाल, किसान मंचचे समन्वयक प्रताप गोस्वामी, ग्रीन व्हिजिलचे कौस्तूभ चॅटर्जी, महाविदर्भ जनजागरण समितीचे समन्वयक नितीन रोंघे, नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रिय महासचिव अहमद कादर, लीव्हरेज ग्रील को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग संघाचे सचिव राजेश मंत्री, कास्तकारी जनआंदोलनाचे अध्यक्ष विलास भोंगाडे, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे, सृष्टी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष संजय देशपांडे, राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे संयोजक विवेकानंद मायने आदिनी सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button