चिंता वाढवणारी बातमी: हवामान बदलामुळे अंटार्क्टिकामधून येऊ शकते त्सुनामी, एका नवीन अभ्यासात दावा | पुढारी

चिंता वाढवणारी बातमी: हवामान बदलामुळे अंटार्क्टिकामधून येऊ शकते त्सुनामी, एका नवीन अभ्यासात दावा

पुढारी ऑनलाईन: भविष्यातील जगासोमरचं सर्वात मोठं म्हणजे हवामान बदल. माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. अशातच हवामान बदलाविषयी एक नवीन अभ्यास समोर आला आहे, ज्याने जगाची चिंता वाढली आहे.

सध्या उष्णतेची लाट जवळजवळ संपूर्ण भारताला त्रासदायक ठरत आहे. हवामान बदलासाठी जर हा पुरेसा पुरावा वाटत नसेल तर एक नवीन अभ्यास चिंताजनक परिस्थितीकडे निर्देश करत आहे. या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, हवामान बदल अंटार्क्टिकामध्ये पाण्याखालील भूस्खलनास कारणीभूत ठरून दक्षिण महासागरात मोठ्या प्रमाणावर त्सुनामी आणू शकतात. समुद्राच्या तळाच्या खाली असलेल्या गाळाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवटच्या हवामान बदलादरम्यान (3 दशलक्ष ते 15 दशलक्ष वर्षांपूर्वी) गाळाचे सैल थर तयार झाले आणि त्यानंतर दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड आणिआग्नेय आशियाच्या दिशेने महाकाय त्सुनामी येऊ लागल्या.

हवामान बदलामुळे त्सुनामी कशी येऊ शकते

18 मे रोजी जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे महासागरांच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे पुन्हा अशाच प्रकारच्या त्सुनामी येऊ शकतात. सबमरीन भूस्खलन हा त्सुनामी निर्माण करण्याबरोबरच एक मोठा भू-धोका आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असं यूकेमधील प्लायमाउथ विद्यापीठाच्या जेनी गॅल्स यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

अंटार्क्टिकामध्ये लाखो वर्षांपूर्वी झाले होते भूस्खलन

आमचे निष्कर्ष हे अधोरेखित करतात की, जागतिक हवामान बदलाचा या प्रदेशांच्या स्थिरतेवर आणि भविष्यातील त्सुनामीच्या संभाव्यतेवर कसा परिणाम होऊ शकतो, याविषयी आपली समज वाढवण्याची नितांत गरज आहे, असं देखील या निवेदनात म्हटलं आहे. अंटार्क्टिकामध्ये लाखो वर्षांपूर्वी भूस्खलन झाले, जेव्हा महासागरांचे तापमान वाढले होते. या भूस्खलनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणे हे बहुधा कारण असावे.

 

Back to top button