Karnataka Accident : कर्नाटकात बस आणि कारच्या भीषण अपघातात १० जण ठार | पुढारी

Karnataka Accident : कर्नाटकात बस आणि कारच्या भीषण अपघातात १० जण ठार

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील मैसुरजवळील नरसीपुरा तालुक्यात खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात सोमवारी (दि.२९) कुरुबुरु गावाजवळ कोल्लेगला-टी नरसीपुरा या मार्गावर घडला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Karnataka Accident)

म्हैसूरच्या एसपी सीमा यांनी या १० भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. मृतदेह कारमधून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Karnataka Accident)

कार मधील मृत बेल्लारी जिल्ह्यातील संगनकल्लू येथील रहिवासी होते. ते संध्याकाळी बीआर हिल्स येथून परतत होते. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. खासगी बस कोल्हेगऱ्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील तीन जखमींनाही चामराजनगर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. (Karnataka Accident)

अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कार कापून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह ‘छिन्नविछिन्न’ अवस्थेत होते. अपघातात बाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. त्यांनी उपायुक्तांना अपघातस्थळ व रुग्णालयाला भेट देण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर लिहिले की, “म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या अपघाताने दुःखी, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.”


अधिक वाचा :

Back to top button