कुणी कितीही चौकशा कराव्यात काहीही फरक पडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

कुणी कितीही चौकशा कराव्यात काहीही फरक पडणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

कोणी कितीही आरोप केले आणि कितीही चौकशी लावली तरीही काहीही फरक पडणार नाही. खोटे आरोप केल्याने खूप प्रसिद्धी मिळते, यामध्ये विरोधकांना आनंद वाटतो. विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवीतच राहणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे रविवारी (दि.१७) चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. दरम्यान, कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी पवार कुटुंबीयावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया दिली. त्‍या म्‍हणाल्‍या, मागील काही दिवसांमध्ये अनेकांवर ईडी चौकशी लावली जात आहे. यातही पवार कुटुंबीयावर अधिक लक्ष दिले जात आहे. ईडी किंवा इतर चौकशींना आम्ही घाबरत नाही. कोणीही कितीही चौकशी करू द्या, सत्य बाहेर येईल. आमच्यावर टीका केल्यामुळे जर कुणी मोठे होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. ट्रकभर पुरावे कुठे गेले, हे महाराष्ट्राने बघितले आहे. ईडी आणि पाऊस या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी लकीच आहेत, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याप्रश्‍नी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तरीही ओबीसी नेत्यांनी आपल्याला आणखी मार्गदर्शन करावे, सर्वांनी मिळून प्रयत्न करून ओबीसींचा प्रश्न मार्गी लावू. राज्यात महाआघाडी सरकार चांगले काम करीत आहे. लसीकरणामध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच कामात नाही तर प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला समोर न्यायचे असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपण केवळ खासदार

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणाला काय वाटते, हे माहीत नाही. मात्र, आपण केवळ खासदार आहोत आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे हेच आपले काम असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button