

पणजी, पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने लोकांना याची झळ पोहोचत आहे. या पार्श्ववभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आमदार जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासोबत पायी चालत जात विधानसभेमध्ये हजेरी लावली.
भाजप सरकारच्या 2017 ते 2022 या कालावधीतील शेवटच्या दोन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांनी 18 आणि 19 रोजी विशेष अधिवेशन घेण्याचा आदेश जारी केला होता.
पणजी येथील कदंबा बस स्थानकावरील मारुती मंदिरापासून पर्वरी येथील विधानसभा भवनापर्यंत ते चालत गेले. यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, "वाढती महागाई हे भाजप सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. जर आमचे सरकार सत्तेत आले तर आम्ही पेट्रोलच्या किंमती 20 टक्क्याने कमी करू", अशी ग्वाहीही सरदेसाई यांनी दिली.
"ई-बसमधून कदंबापर्यंत आल्याबद्दल ते म्हणाले की, "अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. आम्हीही भविष्याच्या पर्यायाचा विचार करून ई-वाहनातून आलो आहोत. यावेळी त्यांनी हे सरकार सर्वच बाजूने अपयशी झाले आहे", असेही सरदेसाई यांनी सांगितले.
विधानसभेत पहिला मुद्दा हा प्राणवायूच्या कमतरतेमुळे राज्यात झालेल्या मृत्यूंबद्दल असणार आहे. आम्ही सरकारला जाब विचारणार आहाेत. यामध्ये पूर्ण चूक ही मुख्यमंत्र्यांचीच आहे. आणि त्यांनी याबद्दल राजीनामा दिला पाहिजे. गोव्याच्या एका तरुणाला केवळ नोकरीकरिता नावनोंदणीसाठी 1000 रु. द्यावे लागतात. लाखो तरुण यासाठी अर्ज करतात. नोकरीच्या जाहिराती काढल्या जातात आणि नंतर त्या बंद केल्या जातात. मात्र लोकांचे पैसे परत मिळत नाहीत. सरकारकडे येणार्या पैशांचे काही ऑडिट आहे का, असा सवाल करून त्यांनी हे सरकार पाकीटमार आहे, अशी टीकाही विजय सरदेसाई यांनी केली
पहा व्हिडीओ : सत्ता मिळत नाही म्हणून महाराष्ट्रावर अॅसिड हल्ले – उद्धव यांची टीका