नागपूर जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांमध्ये काँग्रेसला कौल; रामटेकमध्ये केदार-जैस्वाल युतीला धक्का | पुढारी

नागपूर जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांमध्ये काँग्रेसला कौल; रामटेकमध्ये केदार-जैस्वाल युतीला धक्का

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील तीन बाजार समितीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाचे निकाल आज (दि. २९) जाहीर झाले. रामटेकमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांची युती मतदारांनी झुगारली. या ठिकाणी केदार यांचेच कार्यकर्ते असलेल्या काँग्रेसचे सचिन किरपान, बिनू गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या 18 पैकी 14 जागा निवडून आल्या. 4 जागा भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसच्याच गज्जू यादव यांच्या आघाडीला मिळाल्या.

दोन वर्ष आम्ही मेहनत केली आणि ऐनवेळी नेत्यांनी आपल्या सोयीची युती केली. याविरोधातील हा कौल असल्याची संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. दुसरीकडे मांढळमध्ये काँग्रेसला 17 तर 1 अपक्ष असा परंपरागत काँग्रेसला कौल मिळाल्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे यांनी भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांना मात दिली आहे. पारशिवणीत काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. या ठिकाणी सर्व 18 जागा केदार गटाने काबीज केल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. सावनेर बाजार समितीमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार गटाने विरोधकांना धूळ चारुन सर्व १८ जागा यापूर्वीच जिंकल्या. विरोधकांनी सुनील केदार यांच्या गटाविरोधात उमेदवारच न दिल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले हे विशेष. दरम्यान, रामटेक, कुही-मांढळ आणि पारशिवनी बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झाले. रामटेक बाजार समितीमध्ये केदार गटाविरोधात चार पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. शेवटी आमदार सुनील केदार यांनी वर्चस्वाच्या लढाईत शिंदे गट अर्थात खा. कृपाल तुमाने, शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्यासोबत युती करून विरोधकांविरोधात दंड थोपटले. मात्र, त्यांच्या युतीची जादू चालली नाही, मतदारांनी त्यांची आघाडी स्पष्टपणे नाकारली. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी काँग्रेसचे गज्जू यादव यांच्यासह इतर दोन पक्षांची आघाडी उभारली. निकालात या आघाडीला 4 जागांवर समाधान मानावे लागले. हा शिंदे गटाला धक्का आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. यावेळी मात्र, त्यांचे खंदे समर्थक त्यांच्याच विरोधात गेल्याने शेवटी आशीष जयस्वाल यांच्या गटासोबत त्यांना युती करावी लागली. अखेरीस नेत्यांची सत्तेसाठीची विचित्र आघाडी मतदारांनी झुगारून देत कार्यकर्त्यांच्या पदरात यश टाकले आहे.

हेही वाचा : 

Back to top button