जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील | पुढारी

जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल.

बारामती : नाझीरकरांसह इतरांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा

या गावांमध्ये झाले नुकसान…

जळगाव तालुक्यातील नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते.

नुकसानग्रस्तांना मिळणार घरकुलाचा लाभ

यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले की, ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येत असून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत त्यांची नावे घरकुलांच्या यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल. तसेच महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल असेही सांगितले.

हेही वाचा :

Back to top button