पुणे बाजार समिती निकाल : ग्रामपंचायत मतदार संघात ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव विजयी | पुढारी

पुणे बाजार समिती निकाल : ग्रामपंचायत मतदार संघात ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव विजयी

पुणे; पुढारी वृतसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झाल्यामुळे समसमान जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहिर झाले असून विजयी उमेदवारांनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव ( वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेवून विजयी झाले आहेत.

या गटात महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे पराभूत झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघाच्या एका जागेवर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत. विजय घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Back to top button