सभा घ्या पण वैयक्तिक टीका सहन करणार नाही : बावनकुळेंचा मविआ नेत्यांना इशारा | पुढारी

सभा घ्या पण वैयक्तिक टीका सहन करणार नाही : बावनकुळेंचा मविआ नेत्यांना इशारा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा पूर्व नागपुरच्या दर्शन कॉलनी येथील मैदानावर रविवारी होत आहे. सभा स्थळावरून वाद सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेपुर्वीच मविआ नेत्यांना इशारा दिला आहे. “मविआच्या सभेला आमचा विरोध नाही. वज्रमुठ घ्या नाही तर आणखी कोणती मुठ घ्या. पण, त्यांनी व्यक्तिगत टीका केली तर ती चालणार नाही. या सभेत आमच्या नेत्यांचा अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही. एकदा आम्ही हा अपमान सहन केला आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही बोललात तर आम्ही ते मान्य करणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.

महाविकास आघाडीकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर, पक्षीय धोरणावर बोलावे, त्याला कसलीही मनाई नाही. विरोधकांनी विकासावर आधारित काही मुद्दे मांडले तर सरकारला सुधारणा करता येतात, बदल करता येतो. पण, आमच्या नेत्यांबाबातचे अनुद्गार यापुढे खपवून घेणार नाही.

महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमुठ सभा घेतल्या जात आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात पार पडल्यानंतर दुसरी सभा नागपुरात होते आहे. या सभेच्या ठिकाणाला स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा विरोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभा घेतली जाऊ नये, यामागणीसह न्यायालयात धाव घेतली आहे. मविआ नेत्यांकडून मात्र याच मैदानावर सभेची तयारी सुरू आहे. भाजप घाबरल्यामुळेच हा विरोध असल्याची टीका केली जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी करीत संभाजीनगरच्या सभेपेक्षा दुप्पट गर्दी नागपूरच्या सभेत होणार असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button