नागपूर जिल्ह्यात १ मे पासून बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेचा प्रारंभ | पुढारी

नागपूर जिल्ह्यात १ मे पासून बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेचा प्रारंभ

नागपूर; वृत्तसेवा : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या सर्व 13 तालुक्यामध्ये येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून या दवाखान्यांना सुरुवात होणार असून, त्यासाठी आवश्यक डॉक्टरांसह इतर आरोग्य सेवकांच्या पदभरतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. या दवाखान्यामुळे ग्रामीण आरोग्याला एक ‘बुस्टर’ मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात एकूण ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांव्दारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या क्षेत्रामध्ये जसे वाडी, कळमेश्वर, रामटेक, सावनेर आदी ठिकाणी दवाखाने सुरु होणार आहेत. या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडन्ट आदींची कंत्राटीपध्दतीने भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, हे आपले दवाखाने सध्या भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत औषधीसाठी १५ व्या वित्त आयोगाकडून ४० लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही या दवाखान्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संदर्भात आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, औषध खरेदीचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रामीण भागात पीएचसी, उपकेंद्रापाठोपाठ आता या आपले दवाखान्यामुळे ग्रामीण आरोग्याला एकप्रकारे बुस्टर मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

अधिक वाचा :

Back to top button