

Nagpur Zilla Parishad byelection : नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी शेकाप आघाडीने बाजी मारली. १६ पैकी १३ जागा काँग्रेस- राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने पटकाविल्या तर भारतीय जनता पक्षाला २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर डिगडोह इसासनी या ठिकाणची एका जागेची मतमोजणी अद्याप सुरू आहे.
बुधवारी लागलेल्या निकालात काँग्रेसला ९, राष्ट्रवादीला २, शेकाप १, गोंडवाना गणतंत्र पार्टी १ आणि भाजपला २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या काटोल मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांवर पराभव पत्करावा लागला. काटोल मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला. त्यामुळे मतदारांनी अनिल देशमुख यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का दिला आहे.
काँग्रेसचे विद्यमान मंत्री सुनिल केदार यांनी त्यांचा सावनेर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांवर विजय मिळवून त्यांचा गड राखला आहे. तर भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला त्यांचं खातंही उघडता आले नाही. शिवसेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ३ तर शेकापचा १ उमेदवार निवडून आला. हा आमचा एकजुटीचा विजय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
ओबीसी समाजावर भाजपने केलेल्या अन्यायाचे उत्तर मतदारांनी दिले. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री राजेन्द्र मुळक यांनी दिली आहे. तर काँग्रेसने सत्तेचा आणि पैशाचा अमर्याद वापर केला. १७ जागांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने पन्नासहून अधिक आमदार प्रचाराला जुंपले. त्यामुळेच भाजपचा पराभूत झाला, असे भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
Nagpur Zilla Parishad byelection :
जिल्हा- नागपूर
जिल्हा परिषद निकाल
जागा १६
निकाल प्राप्त १५
भाजप-०२
शिवसेना-००
राष्ट्रवादी-२
काँग्रेस- ९
शेकप – ०१
गोंडवाना गणतंत्र पार्टी ०१
इतर-००